नागपूर: नागपुरात ७ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. या काळात कुठल्याही यंत्रणेने शहरात खोदकाम करू नये. असे महावितरणचे म्हणणे आहे. हिवाळी अधिवेशनात अखंडित वीजपुरवठ्यासाठी महावितरणने काम सुरू केले आहे.
नागपूर शहरात आज मेट्रो, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पाणीपुरवठा, महानगरपालिका, दूरसंचार विभाग, खासगी इंटरनेट आणि केबल टीव्ही कंपन्या यांसारख्या अनेक विभागांमार्फत मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहेत. त्यासाठी मोठ-मोठ्या ड्रील मशिन्सच्या सहाय्याने खोदकाम केले जात आहे. या कामांमुळे भूमिगत वीज वितरण यंत्रणेचे नुकसान होत असून अनेकदा वीजपुरवठा खंडित होतो. कंत्राटदार लवकर काम करण्यासाठी इतर विभागाशी समन्वय टाळतो. त्यामुळे वीज यंत्रणेला धोका संभावतो. त्यामुळे ही कामे अधिवेशन काळात करू नये, असे आवाहन महावितरणने केले.
हेही वाचा – बुलढाणा : खामगाव तालुक्यात अवकाळी व गारपिटीचे थैमान; वीस मेंढ्या दगावल्या
हेही वाचा – ४० सीसीटीव्ही फुटेज, ७१ वाहनांची तपासणी, तरीही ठाणेदाराचे पिस्तूल मिळेना
दरम्यान, महावितरणचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, मुख्य अभियंता दिलीप दोडके, अधीक्षक अभियंता अमित परांजपे आणि इतर अधिकाऱ्यांनी सोमवारी विधिमंडळ, राजभवन, रवीभवन, नागभवन आणि इतरही भागांतील विविध उपकेंद्रांना भेट देत तेथील संपूर्ण व्यवस्थेचा आढावा घेतला.