लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : राज्यातील किमान तापमानाच्या पाऱ्यात घसरण सुरू झाली असून तो १४-१५ अंश सेल्सिअस पर्यंत खाली उतरला आहे. मात्र, अजूनही तो आताच्या किमान तापमानापेक्षा अधिक आहे. उत्तर भारतात पश्चिम हिमालयीन क्षेत्रामध्ये पश्चिमी प्रकोपामुळे रविवारपासून राज्यात थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे.

शुक्रवारपासून महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांसह विदर्भातील अमरावती, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत किमान तापमानात घसरण होण्यास सुरुवात होईल व हळूहळू थंडीची चाहूल लागण्याची शक्यता आहे. रविवार, १९ नोव्हेंबरपासून उत्तर भारतात पश्चिमी प्रकोपाची आणि त्यामुळे पाऊस व बर्फवृष्टीची शक्यता आहे. या प्रभावाखाली महाराष्ट्रामध्ये थंडी जाणवण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये मात्र २२ नोव्हेंबरपर्यंत किमान तापमानाचा पारा फार खाली उतरण्याची शक्यता नाही. मुंबई आणि महामुंबई परिसरात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि वनक्षेत्राच्या परिसरामध्ये पहाटेच्या तापमानात काहीशी घट जाणवत आहे.

आणखी वाचा-नागपूर : मेडिकलच्या १७ माजी विद्यार्थ्यांना पद्मश्री-पद्मभूषण, तिघांना मॅगसेसे पुरस्कार

मात्र, त्या पलीकडे मुंबईला फारसा दिलासा मिळण्याची शक्यता नाही. कमाल तापमानात सध्या तरी मुंबईला दिलासा मिळण्याची शक्यता नाही. मात्र, बंगालच्या उपसागरात असलेल्या प्रणालीचे चक्रीवादळात रूपांतर झाल्यानंतर १९ ते २३ नोव्हेंबरदरम्यान कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांत वातावरण काहीसे ढगाळलेले असेल. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान कमी होऊ शकते. मात्र यामुळे पावसाची शक्यता नाही, असे खुळे यांनी सांगितले. राज्यात केवळ कोकण विभागात सध्या किमान तापमानाचा पारा २० अंशांपलीकडे नोंदला जात आहे. उर्वरित राज्यात पहाटेचे वातावरण सुखद आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Winter update force of cold will increase in the state from sunday rgc 76 mrj
Show comments