लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : राज्यात डिसेंबरच्या पूर्वार्धात कडाक्याची थंडी पडली. राज्यातील अनेक शहरांमध्ये किमान तापमानाचा पारा चार ते पाच अंश सेल्सिअसवर पोहचला. गोठवणाऱ्या थंडीमुळे ठिकठिकाणी शेकोट्या पेटलेल्या दिसून येत होत्या, पण आता या थंडीचा जोर काहीसा ओसरत चालला आहे. राज्यातील किमान तापमानात वाढ झाली आहे आणि आता हवामान खात्याने चक्क पावसाची शक्यता वर्तवली आहे.

राज्यात नुकतेच नागपूर येथे हिवाळी अधिवेशन पार पडले. अधिवेशनाची सुरुवातच कडाक्याच्या थंडीने झाली. त्यामुळे या थंडीची सवय नसलेल्या आणि राज्यातून वेगवेगळ्या भागातून आलेल्या राजकीय, शासकीय व्यक्तींना ही थंडी चांगलीच बाधली. अधिवेशनाच्या पूर्व संध्येला नागपुरात सात अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदवले गेले. तीन ते चार दिवस थंडीचा जोर कायम होता, तर अधिवेशन संपताना अखेरचे दोन दिवस हा जोर काहीसा ओसरला. आता हवामान खात्याने हा जोर आणखी ओसरणार असून पावसाची शक्यता वर्तवली आहे.

आणखी वाचा-असा गुरु, असा शिष्य! मंत्रिपद मिळाल्यानंतर प्रथम भेट सावंगीत…

बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा येत्या काही तासात पुढे सरकणार असून पूर्व-इशान्येकडे दाब वाढणार आहे. परिणामी इशान्येकडील राज्यांमध्ये पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. याचाच परिणाम महाराष्ट्राच्या तापमानावर होणार असून पुढील दोन दिवसात राज्यात काही भागात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. किमान तापमानात वाढ झाली असून विदर्भात येत्या २४ व २५ डिसेंबरला हलक्या ते मध्यम सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही आर्द्रता वाढणार असून काही भागात वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता कडाक्याच्या थंडीला “ब्रेक” मिळणार असून तापमानात काहीशी वाढ होणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

आणखी वाचा-तर पीक विम्याच्या बोगस प्रकरणाची सखोल चौकशी- देवेंद्र फडणवीस

गेल्या काही दिवसात हाडे गोठवणारी थंडी होती. त्यावेळी चार ते पाच अंश सेल्सिअस वर असणारे किमान तापमान आता ११ ते १५ अंश सेल्सिअसवर पोहचले आहे. राज्यातील काही भागात गारठा कायम असला तरी कमाल तापमानात वाढ झाली आहे. राज्यात किमान तापमानात वाढ झाली असून तापमानाचा पारा काहीसा वाढलाय. मुंबईत कुलाबा आणि सांताक्रूझमध्ये किमान तापमान २० अंशांवर गेले. नाशिक येथेही १२ ते १८ अंश सेल्सिअसवर होते. तर नागपुरात देखील तापमान १६ अंश सेल्सिअसवर पोहचले होते पण शनिवारपासून ते पुन्हा कमी होत ११ अंश सेल्सिअसवर आले आहे. चंद्रपूर, गोंदिया आदी शहरात देखील तापमानात वाढ झाली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Winter will take break meteorological department predicts rain rgc 76 mrj