गडचिरोली : दिवसेंदिवस विज्ञानाची होत चाललेली प्रगती डोळे दिपवणारी असताना आजही अनेकजण अंधश्रध्देच्या आहारी जात असल्याचे चित्र आहे. असाच एक प्रकार उघडकीस आल्याने गडचिरोली शहरात खळबळ उडाली असून व्यावसायिक स्पर्धेतून असे प्रकार केले जात असल्याची चर्चा आहे.

चंद्रपूर मार्गावरील एका प्रसिद्ध मिठाई दुकानाच्या मालकाने आपल्या दुकानावर रात्रीच्या सुमारास कुणीतरी जादूटोणा करीत असल्याचा आरोप केला आहे. मंगळवारी दिवसभर याची चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित झाल्याने नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला. यात अंगावर शाल ओढलेला एक व्यक्ती दुकानापुढे येतो, मंत्र पुटपुटतो आणि काहीतरी तंत्रमंत्र लिहिलेले साहित्य दुकानापुढे ठेऊन निघून जातो. हा प्रकार मागील काही दिवसांपासून सुरू आल्याचे दुकानदाराचे म्हणणे आहे.

हेही वाचा >>> गुड न्यूज! नागपूर-गोवा रेल्वेगाडी जुलैपर्यंत धावणार

अखेर त्रासून त्याने चित्रफीत व स्वतःच्या आवाजातील ‘ऑडिओक्लिप’ समाजमाध्यमावर प्रसारित करून हा प्रकार उघडकीस आणला.  मात्र, याबद्दल अद्याप पोलीस तक्रार केली नाही. हा सर्व प्रकार बघून दुकानात येणारे ग्राहक देखील संभ्रमात पडले आहे. राज्यात जादूटोणाविरोधी कायदा अस्तित्वात आहे. मात्र, समाजात अनेकजण जादूटोणा सारख्या अंधश्रध्देवर विश्वास करीत असल्याने आजही हा प्रक्रार पाहायला मिळतो आहे.

Story img Loader