लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर: नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाल्याने महामेट्रोने मेट्रोच्या वेळापत्रकामध्ये बदल केले आहेत. सोमवारी २४ जूनपासून मेट्रोच्या खापरी,ऑटोमोटिव्ह चौक, प्रजापती नगर आणि लोकमान्य नगर स्थानकावरून सकाळी ८ ते रात्री ८ या दरम्यान दर १० मिनिटांनी मेट्रो सुटणार आहे. त्यानंतर रात्री १०.३०पर्यत पूर्वीप्रमाणेच मेट्रो धावेल.

शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली आहे. राज्य मंडळाच्या शाळाही लवकरच सुरू होणार आहेत. शाळांच्या वेळा लक्षात घेता महामेट्रोने त्यांच्या मेट्रोच्या वेळापत्रकात बदल केले. सध्या स्थितीत मेट्रो सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत सुरू असून दर १५ मिनिटानी सुटते.आता सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत मेट्रो दर दहा मिनिटांनी मेट्रो सुटणार आहे.

आणखी वाचा-नागपूर : पार्टीचा बेत; चिकन, मासोळी शिजवण्यावरून वाद अन् डोक्यात घातला दगड…

काही शाळा-महाविद्यालये संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहतात तर अनेकदा विद्यार्थी अतिरिक्त वर्गात उपस्थित राहतात.नागपूर मेट्रोने प्रवासी भाड्यात ३३ टक्केपर्यंत कपात केली आहे. तसेच विद्यार्थ्यांना महाकार्डवर मिळणाऱ्या ३० टक्के कपातीशिवाय विद्यार्थीकरता जवळपास ५० पर्यत कमी झाले आहे. प्रवासी तिकीट संरचनेमुळे नागपूर मेट्रोच्या प्रवासी संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. महा मेट्रोने नुकतेच व्हॉट्सऍप तिकीट सेवा सुरू केली आहे, ज्यामुळे केवळ प्रवासाचा वेळच वाचत नाही तर यामुळे तिकीट खरेदीसाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाहीशी झाली आहे. व्हॉट्सॲप तिकीट मुळे तिकिटाच्या छपाईसाठी लागणारा आवश्यक कागद देखील जतन केला जात आहे. महा मेट्रोने प्रवाश्याना तिकीट खरेदी करिता खालील अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.

आणखी वाचा-अमरावती : ‘एसआरपीएफ’ भरती, मैदानी चाचणी दरम्यान उमेदवार जखमी

मेट्रो आता शहराच्या चारही दिशांनी धावत आहे. मेट्रोच्या मार्गावर अनेक शाळा, महाविद्यालये आहेत. त्याचा विद्यार्थांना फायदा होतो. शालेय बसेस, खासगी वाहनांच्या तुलनेत मेट्रोने प्रवास स्वस्त व सुरक्षित असल्याने अनेक विद्यार्थी मेट्रोचा वापर करतात. त्यामुळे मेट्रोतील प्रवासी संख्याही वाढली आहे. मेट्रोत सायकल नेण्याची मुभा आहे. त्यामुळे विद्यार्थी जवळच्या स्थानकावर उतरून शाळा किंवा महाविद्यालयात सहज जाऊ शकतात. त्यामुळे शालेय विद्यार्थांचा कल मेट्रोकडे वाढला आहे. रस्त्यावरची वर्दळ व होणारे अपघात यामुळे पालक मुलांना खासगी वाहनाने शाळेत किंवा महाविद्यालयात पाठवण्यास इच्छुक नाही. मेट्रोचा प्रवास सुरक्षित असल्याने पालकांनीही मेट्रोला पसंती दिली आहे. विशेषत: वर्धारोड, हिंगणा रोड आणि कामठी रोड हे अत्यंत वर्दळीचे मार्ग आहेत. या मार्गालगत असलेल्या शाळा, महाविद्यालयांसाठी मेट्रो सुयोग्य आहे. या शिवाय विद्यार्थ्यांना तिकीट दरात सवलत दिली जात आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: With the start of the new academic session mahametro has changed the metro schedule cwb 76 mrj