नागपूर : गेले काही दिवस अडखळलेल्या माेसमी पावसाची परतीची वाटचाल पुन्हा एकदा सुरू झाली आहे. मध्यप्रदेशातून मोसमी पाऊस महाराष्ट्राच्या सीमेवर पोहोचला आहे. आज शनिवारी उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागातून मोसमी पावसाच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली. दरम्यान, राज्यातून काढता पाय घेत असतानाच पावसाची जोरदार हजेरी लागणार आहे.

राज्यात सहा तारखेपासून मोसमी पावसाच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होईल, असे चित्र होते. मात्र, त्यापूर्वीच पाच ऑक्टोबरला मोसमी पावसाने परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. विजांच्या कडकडाटासह मराठवाडा आणि मध्यप्रदेशात वादळी पाऊस झाला. देशातील अनेक राज्यातून मोसमी पावसाने माघार घेतली आहे.  यादरम्यान, उकाड्यात देखील प्रचंड वाढ झाली. आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने देशातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. राज्यातील काही भागात सहा ते नऊ सप्टेंबरदरम्यान विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाच्या पावसाची हजेरी लागणार आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील नंदूरबार जिल्ह्यापर्यंत  पावसाचा परतीचा प्रवास सुरु झाला.

हेही वाचा >>>“शरद पवार शेतीऐवजी मैदानावर…” शिवराजसिंह चौहान यांची टीका

नौटनवा, सुलतानपूर, पन्ना, नर्मदापूरम, खरगोन, नंदूरबार आणि नवसारी भागात आज पाऊस झाला. पुढील दोन-तीन दिवसात राज्याच्या आणखी काही भागातून मोसमी पाऊस माघारी परतेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. याचवेळी गुजरात आणि मध्यप्रदेशच्या उर्वरित भागातूनही तो माघारी फिरेल. दरम्यान, हवामान खात्याने आज राज्यातील काही भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, पुणे या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.   रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, अहमदनगर, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज आहे. तर उद्या कोकण व मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, पुणे, अहमदनगर, नाशिक, धाराशिव, लातूर जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. सातारा, सोलापूर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव या जिल्ह्यात पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज आहे. तसेच सोमवारी आणि मंगळवारी देखील राज्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. यादरम्यान, तापमानात देखील वाढ होऊ शकते, असे हवामान खात्याने म्हटले आहे.