नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भगव्या ध्वजाशिवाय कोणीही आदर्श नाही. परंतु बाल स्वयंसेवकांना देश कार्यासाठी प्रेरणा मिळायला हवी म्हणून रामभक्त हनुमान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना आम्ही आदर्श मानतो, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज येथे केले.
स्वामी विवेकानंद यांच्या १६० व्या जयंतीनिमित्त बाल स्वयंसेवक यांचे शारीरिक प्रात्यक्षिक नवोन्मेष २०२३ नागपुरातील यशवंत स्टेडियम येथे गुरुवारी सायंकाळी आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बालस्वयंसेवकांना मार्गदर्शन करीत होते.
हेही वाचा >>> नागपूर : धर्म आचरणाने वाढतो, डॉ. मोहन भागवत यांचे प्रतिपादन
सरसंघचालक म्हणाले, आद्य सरसंघचालक डॉ. केशव हेडगेवार, द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी आणि तृतीय सरसंंघचालक बाळासाहेब देवरस यांनी स्पष्ट सांगितले की, संघात कोणतीही व्यक्ती आदर्श नाही. आमच्या समोर आदर्श आहे तो भगवा ध्वज. आमचा आदर्श तत्त्वरूप आहे आणि त्याचे प्रतीक भगवा झेंडा आहे. परंतु निर्गुणाची उपासना फार कठीण असते. तत्त्वाला आदर्श मानून चालणे कठीण असते. बाल स्वयंसेवक शाखेत येतात. देशकार्य करण्यासाठी योग्य बनण्यासाठी ते येतात. सगुण उपसानेसाठी आदर्श म्हणून व्यक्तीच असावी लागते. म्हणून तिन्ही सरसंघचालकांनी दोन नाव सांगितले. ते म्हणजे, रामभक्त हनुमान आणि छत्रपती शिवाजी महाराज होय, असेही ते म्हणाले.