अमरावती : सोबत काढलेले छायाचित्र समाजमाध्‍यमांवर प्रसारीत करण्‍याची आणि बदनामी करण्‍याची धमकी देत खंडणी उकळण्‍याचा प्रयत्‍न करणाऱ्या महिलेसह दोघांविरोधात राजापेठ पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे. तक्रारकर्ते सुरेश (नाव बदलले आहे) हे ४० वर्षीय शेतकरी आहेत. ते येथील शारदा नगर परिसरात राहतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही महिन्‍यांपूर्वी सुरेश यांना आरोपी महिलेची फेसबुकवर ‘फ्रेंड रिक्‍वेस्‍ट’ आली. ती त्‍यांनी स्‍वीकारली. त्‍यांचे नियमितपणे समाजमाध्‍यमांवर संभाषण सुरू होते. सुरेश यांनी आपण विवाहित असल्‍याची मा‍हिती आरोपी महिलेला दिली होती. या महिलेने सुरेशला सासरकडील मंडळींकडून खूप त्रास होत असल्‍याचे सांगितले. काही दिवसांनी या महिलेने सुरेश यांना तुमची भेट घ्‍यायची आहे. सासरी सुरू असलेल्‍या त्रासाबाबत बोलायचे आहे, त्‍यातून तुम्‍ही काही तरी मार्ग सुचवा अशी विनंती केली. नंतर बरेच दिवसांनी सुरेश हे पत्‍नीसमवेत चिखलदरा येथे गेले, तेव्‍हा सुरेश यांनी आरोपी महिलेलादेखील चिखलदरा येथे बोलावले. या ठिकाणी संभाषणादरम्‍यान आरोपी महिलेने सासरी होत असलेल्‍या छळवणुकीविषयी माहिती दिली. त्‍यानंतर सुरेशसोबत छायाचित्र काढण्‍याची विनंती केली. सुरेशने सुरुवातीला छायाचित्र घेण्‍यास नकार दिला. त्‍यावर मदत करणाऱ्या व्‍यक्‍तीचे एक तरी छायाचित्र जवळ असले पाहिजे, अशी भावनिक साद महिलेने घातली. या महिलेने सुरेशसोबत छायाचित्रे काढली. त्‍याच दिवशी सुरेश आणि त्‍यांच्‍या पत्‍नीने चिखलदरा येथे एका हॉटेलमध्‍ये मुक्‍काम केला आणि ते अमरावतीला परतले.

हेही वाचा – नागपुरात डेंग्यूचा कहर; तपासणी मात्र ठप्प…

हेही वाचा – वर्धा : आश्रमशाळेतील मृत्यू अपघाती नव्हे तर खूनच, मित्राचा संताप भोवला

नंतर दोन ते तीन दिवसांनी आरोपी महिला आणि तिचा सहकारी या दोघांनी सुरेश यांच्‍यासोबत संपर्क साधला. आपल्‍याकडील छायाचित्रे समाज माध्‍यमांवर प्रसारीत करण्‍याची आणि कुटुंबीयांमध्‍ये बदनामी करण्‍याची धमकी देत त्‍यांनी सुरेश यांच्‍याकडे ३५ लाख रुपयांची मागणी केली. या प्रकाराने सुरेश चांगलेच हादरले. आरोपी महिला आणि तिच्‍या सहकाऱ्याने वारंवार फोन करून सुरेश यांना त्रास देण्‍यास सुरुवात केली. ३५ लाख रुपये दे किंवा २ बीएचकेचा फ्लॅट तरी घेऊन दे, असा तगादा त्‍यांनी लावला. मागणी पूर्ण न केल्‍यास बदनामी करण्‍याची आणि पोलीस ठाण्‍यात तक्रार दाखल करण्‍याची धमकी दोघा आरोपींनी सुरेश यांना दिली. अखेरीस सुरेश यांनी राजापेठ पोलीस ठाण्‍यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी एक महिला आणि योगेश भोंगाडे (दोघेही रा. देऊरवाडा, ता. चांदूर बाजार) यांच्‍या विरोधात गुन्‍ह्याची नोंद केली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman attempt to extort ransom by threatening to circulate photograph ssb mma 73 ssb
Show comments