बुलढाणा : प्रयागराज येथील महाकुंभमेळाव्यात मंगळवारी मध्यरात्री संगमावर झालेल्या चेंगराचेंगरीनंतर बेपत्ता झालेली बुलढाणा जिल्ह्यातील महिला अखेर सापडली. यामुळे तिच्या कुटुंबीयांसह जिल्हा प्रशासनाने सुटकेचा श्वास सोडला. यासाठी वाराणसी रेल्वे पोलिसांची मदत, पालकमंत्री आणि प्रशासनाचे प्रयत्न कारणीभूत ठरले.मलकापूर येथील उषा बोरले महाकुंभमेळाव्यात बेपत्ता झाल्या होत्या. अखेर तीन दिवसानंतर वाराणसी आरपीएफच्या मदतीने सदर महिला सापडलयाने बोरले परिवाराने सुटकेचा श्वास सोडला.प्रयागराज येथे मंगळवारी मौन अमावस्याला प्रयागराज मध्ये येणारा प्रत्येक भाविक हा संगमावर आखाडयाचे अमृतस्नान पाहण्यासाठी जमा झाला होता. या ठिकाणी बाहेर पडण्यासाठी दुसरा मार्ग नसल्याने समोर गेलेल्या नागरिकांना वापस येण्यासाठी त्याच मार्गाचा वापर करावा लागत असल्याने प्रचंड गोंधळ उडाला होता.
या दहा मिनीटाच्या गोंधळात मलकापूर येथील उषाबाई लक्ष्मण बोरले या बेपत्ता झाल्या . ही महिला यमुनाबाई भालेराव नामक महिले सोबत कुंभमेळयात गेली होती. या घटनेनंतर बोरले परिवाराने सातत्याने त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते.मोबाइलवर संपर्क होत नसल्याने त्यांचे पुत्र संतोष बोरले व आकाश बोरले यांनी या संदर्भात तहसीलदार राहुल तायडे यांना माहिती दिली. दरम्यान काल शुक्रवारी संध्याकाळी सदर महिला सुरक्षीत असल्याची माहिती मिळाल्यावर बोरले परिवाराचा जीव भांडयात पडला.
वाराणसी आरपीएफ आणि अज्ञात व्यक्तीची मदत
दरम्यान घटने पश्चात मोबाइल देखील हरवल्याने उषा बोरले यांचा परिवाराशी संपर्क होवू शकला नाही. तीन दिवसानंतर उषा बोरले यांना अज्ञात व्यक्तीने आपल्या वाहनात जागा देत प्रवासासाठी पैसे देखील देत परिवाराशी संपर्क करुन दिला. त्यांनतर त्यांना वाराणसी पर्यत सोडले. या ठिकाणी वाराणसी आरपीफ यांनी देखील उषा बोरले यांच्या परिवाराशी संपर्क साधत परिवारातील आकाश बोरले व संतोष बोरले यांना उषा बोरले सुखरुप असल्याची माहिती दिली. सदर माहिती मिळताच दोन्ही भावंडे वाराणीसकडे आपल्या मातोश्रीला घेण्यासाठी रवाना झाल्याची माहिती मिळाली. पालकमंत्री मकरंद पाटील यांनी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व वाराणसी प्रशासनशी संपर्क साधला. महिला आणि परिवाराचे बोलणे करून दिले. जिल्हाधिकारी किरण पाटील यांनीही प्रयत्न केले.
पालकमंत्र्याची तत्परता
प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यात हरवलेली वृद्ध महिला अखेर वाराणसी येथे सापडली आहे. पालकमंत्री मकरंद पाटील आणि जिल्हा प्रशासनाच्या सततच्या प्रयत्नांमुळे आणि उत्तर प्रदेश सरकारच्या मदतीने तिला सुखरूप शोधण्यात यश आले. पालकमंत्री मकरंद पाटील यांनी याबाबत माहिती देत सांगितले की, महिलेचा तिच्या मुलासोबत फोनवर संवाद साधून दिला गेला आहे.उषाबाई लक्ष्मण बोरले (राहणार मलकापूर, बुलढाणा) या आपल्या सहकाऱ्यांसोबत कुंभमेळ्यासाठी प्रयागराज येथे गेल्या होत्या. मात्र, गर्दीमध्ये त्या हरवून गेल्या आणि त्यानंतर त्यांच्यासोबत गेलेल्या महिलेशीही संपर्क होऊ शकला नाही. यामुळे कुटुंबीयांमध्ये मोठी चिंता पसरली होती. महिला बेपत्ता होण्याची माहिती मिळताच पालकमंत्री मकरंद पाटील, जिल्हा प्रशासन आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने उत्तर प्रदेश प्रशासनाशी संपर्क साधला. अखेर, समन्वयातून महिलेचा ठावठिकाणा वाराणसी येथे लागला.पालकमंत्री मकरंद पाटील यांनी उत्तर प्रदेश सरकारशी समन्वय साधून महिलेचा शोध घेतला. पोलिसांनी तिला सुरक्षित स्थळी हलवून तिच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यास मदत केली.