नागपूर : पाकिस्तानच्या कराचीमध्ये राहणारी आणि नंतर नागपूरची सून झालेल्या एका महिलेला भारताचे नागरिकत्व प्राप्त करण्यासाठी तब्बल तीन दशकांचा संघर्ष करावा लागला. मूळत: तेलुगु वंश असलेली कमला गट्टू हिचा भारतीय नागरिकत्व मिळविण्याचा प्रवास देशाची फाळणी, स्थलांतर आणि सांस्कृतिक ओळख अशा गुंतागुंतीचा राहिलेला आहे. कमला या तीस वर्षांपासून व्हिझावर भारतात राहत आहेत. मागील आठवड्यात तीस वर्षाच्या संघर्षानंतर कमला यांना भारतीय नागरिकत्व प्रदान करण्यात आले आणि नागपूरची सून खऱ्या अर्थाने भारतीय झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागरिकत्व मिळविण्याचा संघर्ष

कमलाची कथा पाकिस्तानच्या सिंध प्रांतातून भारतात स्थलांतर केलेल्या लोकांपेक्षा फार वेगळी आहे. देशात नागरिकत्व सुधारणा कायदा अस्तित्वात आल्यावर कमला यांना त्या मार्गातून नागरिकत्व मिळविण्याची अपेक्षा होती. मात्र कमला यांना नागरिकत्व मिळविण्यासाठी नैसर्गिकीकरणाच्या पारंपारिक नियमाचा आधार घ्यावा लागला. नैसर्गिकीकरणाच्या या नियमासाठी एखाद्या व्यक्तीला देशात किमान बारा वर्ष रहिवासी राहावे लागते. यानंतर क्लिष्ट प्रक्रियेतून अर्ज केल्यावर त्यांना भारताचे नागरिकत्व प्रदान करण्यात येते. कमला हिची कथा पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या अल्प प्रमाणात माहिती असलेल्या तेलुगु समुदायाच्या अस्तित्वावर देखील प्रकाश टाकते. ब्रिटिश राजवटी दरम्यान तेलुगु समुदाय पाकिस्तानच्या सिंध प्रांतात स्थलांतरित झाला होता आणि फाळणीनंतर तिथेच स्थायिक राहिला.

हेही वाचा…Video : आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट, महागड्या कार भस्मसात; मलकापूरमध्ये भीषण…

नव्वदीच्या दशकापासून संघर्ष

कमला गट्टू यांच्या संघर्षाची कथा नव्वदीच्या दशकात सुरू होते. स्वातंत्र्यपूर्व काळात अविभाजित भारतात तेलुगु बहुल भागात राहणारे तिचे पूर्वज १९३० मध्ये कराची येथे स्थलांतरित झाले होते. कमलाचे आईवडील मानाजी बनकर आणि मोनाबाई या चांगल्या संधीच्या शोधात कराची येथे गेले होते. स्थलांतराच्या या घटनेच्या ६० वर्षानंतर म्हणजेच १९९० मध्ये कमला पुन्हा भारतात आली. कमला आणि त्यांची बहिण यांचा विवाह नागपूरमध्ये राहणाऱ्या तेलुगु कुटुंबातील व्यक्तीशी झाला. त्या काळात विवाहासाठी कराचीमध्ये तेलुगु कुटुंबातील कुणीही नसल्याने नागपूरमध्ये त्यांचा विवाह संपन्न झाला. यानंतर सिंध प्रांतातून भारतात येणाऱ्या स्थलांतरित लोकांसाठी कार्य करणाऱ्या सिंध हिंदी पंचायत या संस्थेने त्यांना भारतीय नागरिकत्व प्राप्त करण्यासाठी मदत केली. बऱ्याच संघर्षानंतर अखेर कमला आणि त्यांची बहिण भगवंती यांना मागील आठवड्यात भारतीय नागरिकत्व प्राप्त झाल्याचा निर्णयाबाबत माहिती मिळाली. मात्र नागरिकत्व प्राप्त करण्याच्या आनंदासोबत त्यांचा कुटुंबाच्या विभक्तीकरणाचे दु:खही त्यांना सहन करावे लागत आहे. कमला यांचे दोन भाऊ अद्याप पाकिस्तानमध्येच राहतात. भारतीय नागरिकत्व प्राप्त करण्यापूर्वी केवळ दोनदा पाकिस्तानमध्ये गेली होती अशी माहिती देताना कमला यांनी दोन्ही देशातील शासनाने नियमांमध्ये शिथिलता आणावी अशी अपेक्षा कमला यांनी व्यक्त केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman from karachi now nagpur daughter in law struggled for three decades to gain indian citizenship tpd 96 sud 02