लोकसत्ता टीम
बुलढाणा: खामगाव शहरातील एका महिलेने चक्क तिळ्यांना जन्म दिला आहे. या मातेसह तिन्ही बालकांची प्रकृती ठणठणीत असल्याचे वृत्त आहे. या तीळ्यांचा जन्म शहरासाठी कौतुक अन् कुतूहलाची बाब ठरली आहे.
जुळ्यांना जन्म ही अजूनही कौतुकाची बाब ठरते. मात्र, खामगाव शहरातील सपना सचिन जाधव नामक महिलेने तीन बाळांना जन्म दिला आहे. यात दोन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. विशेष म्हणजे तिघांच्या जन्मात एकेक मिनिटाचा फरक असून सपना जाधव यांची ही प्रसूतीची पहिलीच वेळ होती.
आणखी वाचा-नागपूर: धक्कादायक! मुलीच्या अन्ननलिकेत अडकली जांभळाची बी
तीन बाळ होतील असे सोनोग्राफीत कळले होते. त्यामुळे गरोदरपणातच पत्नीची विशेष काळजी घेतल्याचे पती सचिन जाधव यांनी सांगितले. तिन्ही बाळांचे वजन क्रमश: १ किलो ५०० ग्रॅम, १ किलो ५०० आणि १ किलो ३०० असे आहे. तिळ्यांच्या जन्माने जाधव कुटुंबाचा आनंद त्रिगुणीत झाला आहे .
डॉक्टर दाम्पत्याने घेतली काटेकोर दक्षता
खामगावातील ठेंग हॉस्पिटलमध्ये या मातेने एकाच वेळी तीन बाळांना जन्म दिला. डॉक्टर प्रशांत ठेंग आणि प्रियांका ठेंग यांनी या महिलेची सुखरूप प्रसुती केली आहे. २२ वर्षीय महिलेवर विशेष लक्ष ठेवून तिच्यावर उपचार केले. यामध्ये गर्भ नऊ महिने व्यवस्थित वाढविला तसेच नऊ महिन्यापर्यंत तिच्या गर्भास कोणताही धोका होऊ नये याची काळजी घेतली. मात्र तरीही धोका होताच, पण डॉक्टर प्रशांत ठेंग आणि टीमने या तिन्ही बाळांवर उपचार केले. ‘सिजरींग’ च्या माध्यमाने प्रसूती होऊन तिन्ही बाळ सुखरूप आहेत. बाळांचे वजन कमी असल्यामुळे दोन्ही मुलांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.