नागपूर : मानलेल्या भावासोबतच बालपण गेले. शाळा आणि महाविद्यालयातही एकत्रच शिकले. यादरम्यान, भावा-बहिणीच्या पवित्र नात्याला विसरून दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. बहिणीचे लग्न झाले आणि दोघांची ताटातूट झाली. मात्र, लग्नानंतरही दोघांनी प्रेमसंबंध कायम ठेवले. दोघांच्या संबंधाची कुणकुण पतीला लागल्यामुळे प्रकरण भरोसा सेलमध्ये पोहचले. पोलिसांनी तिघांचेही समुपदेशन करून नाजूक नात्यातील गुंता सोडवला.
नरखेड तालुक्यातील एका खेडेगावात राहणारे आशीष आणि सोनाली (काल्पनिक नाव) दोघेही एकमेकांच्या नात्यातील आहेत. आशीष हा सोनालीचा मानलेला भाऊ आहे. त्यामुळे आशीषचे नेहमी सोनालीच्या घरी येणे-जाणे होते. बालपणापासून ते पदवीपर्यंतचे शिक्षण सोबतच घेतले. त्यामुळे दोघांची घट्ट मैत्री. एकमेकांच्या नेहमी सहवासात राहत असताना दोघांमध्ये आकर्षण वाढले. बहीण-भावाच्या पवित्र नात्याला विसरून दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. या दोघांच्या प्रेमसंबंधावर कुटुंबीयांतील कुणालाही संशय नव्हता. त्यामुळे आशीषला भेटायला सोनाली केव्हाही घरी येत होती.
दोघांचेही लग्नाचे वय झाले. सोनालीला बघायला स्थळ येत होते. परंतु, ती काहीही कारण सांगून टाळाटाळ करीत होती. तिला आशीषशी सोबतच राहायचे होते. पण समाजमान्यता नसल्यामुळे दोघांचाही नाईलाज झाला. त्याने सोनालीला लग्न करण्यासाठी प्रोत्साहन दिले. परंतु, प्रेमसंबंध कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. आश्रम शाळेवर शिक्षक असलेल्या विलासशी सोनालीचे लग्न झाले. उच्चशिक्षित सोनालीने मनाला आवर घालून संसार सुरू केला. तिला एक गोंडस मुलगा झाला. यादरम्यान, आशीष नाशिकमध्ये नोकरीला लागला. तो सोनालीला भेटायला तिच्या पतीच्या घरी येऊ लागला. दोघांच्या भेटी पुन्हा वाढल्या. मात्र, दोघेही नात्याने बहीण-भाऊ असल्यामुळे पती व सासरच्यांनी कधीही संशय घेतला नाही.
प्रेमसंबंधाची पतीला लागली कुणकुण
विलास आणि सोनालीचा वाद झाल्यानंतर ती माहेरी न जाता थेट आशीषकडे नाशिकला निघून जात होती. मग कुटुंबीय पती-पत्नीतील वाद मिटवून तिला सासरी पाठवत होते. तसेच उन्हाळ्याच्या सुटीतही ती माहेरी न जाता मुलासह आशीषच्या घरी जात होती. पत्नी व मुलाला आणायला आशीषच्या घरी गेलेल्या विलासला दोघांच्या प्रेमसंबंधाची कुणकुण लागली. मात्र, दोघांनीही प्रेमसंबंधाबाबत नकार देऊन वेळ मारून नेली.
समुपदेशनातून निघाला मार्ग
आशीष आणि सोनालीची तक्रार विलासने भरोसा सेलमध्ये केली. पोलीस निरीक्षक सीमा सुर्वे यांनी तिघांनाही बोलावून घेतले. समुपदेशक समिधा इंगळे यांनी आशीष व सोनालीशी चर्चा केली. सोनालीला संसार, मुलगा व पतीबाबत समुपदेशन केले. तसेच आशीषलाही स्वतःचे भविष्य आणि समाजातील बदनामी याबाबत समजूत घातली. शेवटी सोनालीने पतीसह कोणत्याही तक्रारीविना संसार करण्याची तयारी दर्शवली तर अविवाहित आशीषनेही मामाच्या मुलीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अशाप्रकारे पोलिसांनी नात्यातील नाजूक गुंता सोडवला.