नागपूर : नागपुरात असलेला लग्नसोहळा आटोपून मूर्तीजापूरला जाण्याकरिता कारने निघालेल्या कुटुंबीयांची कार अनियंत्रित झाल्यामुळे रस्ते दुभाजकाला धडकली. भीषण अपघातात कारचे चक्क दोन तुकडेच झाल्याने कारमधील पाचही जण गंभीर जखमी झाले. अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. समृद्धी महामार्गाच्या सर्कलच्या अलिकडे वेणा नदीजवळ हा अपघात झाला. आशादेवी रमेशचंद्र लाहोटी (६७, रा. वाशिम) असे मृत महिलेचे नाव आहे. तर अपघातात त्यांचे दोन मुले, सून व एक नातेवाईक दाम्पत्य जखमी झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लाहोटी कुटुंबीय हे नागपूरला लग्नासाठी कारने (एमएच ३७ व्ही ४३३३) आले होते. लग्नसोहळा आनंदात आटोपला. सर्व नातेवाईकांच्या भेटी घेऊन सोमवारी रात्री ११ वाजता लाहोटी कुटुंब मूर्तीजापूरकडे परत निघाले. मुलगा रोहित रामेशचंद्र लाहोटी (३६) हा कार चालवत होता. यावेळी कारमध्ये त्याची आई आशादेवी लाहोटी, पत्नी तिलक लाहोटी (३२), भाऊ रोशन लाहोटी (३५) व मूर्तीजापूर येथे राहणारे नातेवाईक दाम्पत्य दिनेश मोहनलाल मालानी (३८) आणि सुनिता मालानी (३३) हे सर्व जण कारमध्ये बसले होते.

हेही वाचा >>>नागपूर: पतीला झोपेच्या गोळ्या देऊन पत्नी हॉटेलमध्ये युवकासोबत “नको त्या अवस्थेत”

ते जबलपूर मार्गाने अमरावती मार्गावर जात होते. मध्यरात्र झाल्यामुळे कारचालकाला झोप येत होती. हिंगणा पोलीस ठाणे हद्दीतील समृद्धी महामार्ग सर्कलच्याआधी असलेल्या वेणा नदीजवळ कार चालक रोहितला डुलकी लागली अन अनर्थ झाला. डुलकी लागल्यानंतर काही सेकंदातच अचानक जाग आली. त्याने कार रस्त्याच्या दुभाजकाजवळ धडकणार असल्याचे समजताच कार नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. यातच कार दुभाजकाला जोरदार धडकली. अपघात एवढा भीषण होता की धडकेत कारचे चक्क दोन तुकडे झाले. यात कारमधील पाचही जण जखमी झाले तर रोहितची आई आशादेवी लाहोटी या गंभीर जखमी झाल्या. सर्व जखमींना मागून येणाऱ्या काही वाहनचालकांनी मदत केली.

जखमींना एम्स रुग्णालयात  दाखल केले. उपचारादरम्यान, डॉक्टरांनी आशादेवी यांना मृत घोषित केले. तर जखमींवर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी जावई विठ्ठल राठी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस हवालदार चव्हाण यांनी कार चालक रोहित लाहोटी याच्यावर कलम १०६(१), २८१, १२५ (ब), भान्यासं सहकलम १८४ मो.वा. का अन्वये गुन्हा दाखल केला.

हेही वाचा >>>दोन हेल्मेट कसे सांभाळावे याची चिंता मिटली…आता चक्क हेल्मेटची घडी घालून….

चोवीस तासांत दोन अपघात

हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत समृद्धी मार्गावर गेल्या चोवीस तासांत दोन अपघात झाले. सोमवारी समृद्धी महामार्गावरून वर्धेला जात असलेल्या दाम्पत्याच्या कारला भरधाव ट्रक चालकाने धडक दिली. या अपघातात पती अभिलाश चंद्रकांत ढोणे (३१, रा. वर्धा) यांचा मृत्यू झाला होता तर त्यांच्या पत्नी रुचिका या गंभीर जखमी झाल्या होत्या. चोवीस तासांतच दुसरा अपघात होऊन एक वृद्धा ठार तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना उघडकीस आली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman killed five injured in horrific accident on samruddhi highway nagpur news adk 83 amy