चंद्रपूर जिल्ह्यात वन्यजीव-मानव संघर्ष शिगेला पोहोचला आहे. सलग दुसऱ्या दिवशी सावली तालुक्यात वाघाने हल्ला करून एका महिलेला ठार केले. २०२२ या एका वर्षातला हा ५० वा बळी ठरला आहे.
हेही वाचा- नागपूर : युवकांनी सिग्नल तोडत वाहतूक पोलिसाच्या अंगावरच घातली गाडी
काल बुधवारी वाघाने मूल व सावली तालुक्यात दोन जणांचे बळी घेतले. या दोन घटनांमुळे दहशत पसरली असतानाच आज, गुरुवारी दुपारी १२ वाजता खेडी येथे स्वरूप प्रशांत येलेटीवार (५०) या महिलेला वाघाने ठार केले. शेतात कापूस काढत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
हेही वाचा- नागपूर : भटक्या कुत्र्यांच्या नसबंदी अहवालाचे काय झाले?
एका वर्षात वाघांनी विविध घटनांमध्ये ५० जणांचे बळी घेतल्याने नागरिकांमध्ये वन खात्याविरोधात प्रचंड रोष आहे. माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी वाघांचा बंदोबस्त तत्काळ केला नाही तर राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तसेच भाजपच्या ज्येष्ठ नेत्या माजी मंत्री शोभा फडणवीस यांनीदेखील वन खात्याला वाघांचा बंदोबस्त करा अन्यथा, आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.