गडचिरोली : मकरसंक्रांतीनिमित्त वाण देऊन सायंकाळच्या सुमारास शेतात गेलेल्या महिलेला वाघाने हल्ला करून ठार केले. रमाबाई शंकर मुंजनकर (५५, रा. कोळसापूर) असे मृत महिलेचे नाव असून ही हृदयद्रावक घटना मूलचेरा तालुक्यातील कोळसापूर येथे १५ जानेवारीला सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली. जिल्ह्यात मागील १५ दिवसांतील हा तिसरा बळी आहे. सोमवारी मकरसंक्रांतीचा सण आटोपून रमाबाई सायंकाळी ५ वाजता गावालगतच्या स्वतःच्या शेतात कापूस वेचणीसाठी गेल्या होत्या.

हेही वाचा >>> नागपूर : सासूवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या जावयाला जन्मठेप

मार्कंडा वनपरिक्षेतत्राला चिकटून शेत असून तेथे आधीच वाघ दडून बसलेला होता. या वाघाने त्यांच्यावर हल्ला चढविला. यात त्या मृत्युमुखी पडल्या. रात्री सात वाजेनंतरही त्या घरी न परतल्याने कुटुंबाने शोध घेतला असता त्यांचा मृतदेह जंगलात आढळून आला. यावरून हल्ल्यांनंतर वाघाने रमाबाई मुंजनकर यांना फरफटत जंगलात नेले असावे, असा कयास बांधला जात आहे. मृत रमाबाई यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. या घटनेने परिसरात दहशत निर्माण झाली असून नरभक्षक वाघाला जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे. घटनास्थळी वनपरिक्षेत्र अधिकारी भारती राऊत, मूलचेरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अशोक भापकर यांनी चमूसह धाव घेतली.

Story img Loader