लोकसत्ता टीम
यवतमाळ : पतीच्या निधनानंतर ती आणि दीर एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांनीही लग्न न करता लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. तिने पोटच्या दोन मुलांना गावातच नातेवाईकाकडे सोडून त्या दोघांनी दहा वर्षांपूर्वी दुसऱ्या गावी संसार थाटला. खूप दिवसांनी ते दोघे गावी आले. बोलण्याच्या ओघात वाद झाला आणि त्याने लोखंडी वस्तू तिच्या डोक्यात हाणली. त्यातच तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. एखाद्या थरारपटात शोभावी अशी ही घटना आर्णी तालुक्यातील राणीधानोरा या गावात शनिवारी उघडकीस आली.
तुळजा दत्ता पिलावन ( ३८) रा. कोसदणी, ता. आर्णी असे मृत महिलचे नाव आहे, तर लखन सुभाष पलावन ( ४४) रा. कोसदणी असे मारेकरी प्रियकाराचे नाव आहे. याप्रकरणी तक्रार दाखल होताच पोलिसांनी आरोपीला अटक केली.
काही वर्षांपूर्वी तुळजा यांच्या पतीचे निधन झाले होते. त्यामुळे ती आपल्या दोन मुलांसह कोसदणी येथे राहत होती. दरम्यान कोसदणी येथे तिचे दिरासोबत प्रेमसंबध प्रास्थापित झाले. त्यानंतर दोघांनीही लिव्ह इन रिलेशनशिप सोबत राहण्याचा निर्णय घेतला. तसेच दोन्ही मुलांना कोसदणी येथे नातेवाईकांकडे सोडून तुळजा लखनसोबत नागपूर जवळील बेला येथे राहण्यासाठी गेली. तेथे दोघेही रोजमजुरी करून नवरा, बायकोप्रमाणे राहू लागले. दहा वर्षें ते दोघेही गुण्यागोविंदाने राहत होते.
खूप वर्षांपासून गावी न आल्याने त्यांनी गावाकडे येण्याचे नियोजन केले. त्याप्रमाणे ते दोघेही २७ फेब्रुवारीला आर्णी तालुक्यातील राणीधानोरा येथे कैलास वाणी यांच्याकडे पाहुणे म्हणून आले. दरम्यान वाणी यांच्याकडे २८ फेब्रुवारीला रात्री जेवणादरम्यान दोघांमध्ये किरकोळ वाद झाला. शब्दाने शब्द वाढला. भूतकाळातील वाद विकोपाला गेल्यामुळे लखनने रागाच्या भरात तुळजाच्या डोक्यात लोखंडी वस्तूने वार केला. यात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर नातेवाईंकांनी तिला गंभीर जखमी अवस्थेत लोणबेहळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले. यावेळी लखन देखील तिच्यासोबत होता. प्रकृती चिंताजनक असल्याने तुळजाला पुढील उपचारासाठी यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात व त्यानंतर नागपूर येथे हलविण्यात आले. मात्र ६ मार्चला उपचारादरम्यान तुळजाचा मृत्यू झाला.
या प्रकरणी मृत तुळजाचा मुलगा प्रशांत दत्ता पिलावन (१८) याने शनिवारी आर्णी पोलीस ठाण्यात लखन पिलावन याने लोखंडी वस्तू डोक्यात मारून तुळजा हिचा खून केल्याची तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपी लखनवर खुनाचा गुन्हा दाखल करत त्याला तत्काळ अटक कली. विवाह बंधनात न अडकलेल्या एका नात्याची अखेर वाईट पद्धतीने झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. अधिक तपास आर्णी पोलीस करत आहेत.