अकोला : जीवनात काळ, वेळ सांगून येत नसते. कधी काय होईल, हयाचा काहीच अंदाज लावता येत नाही.अकोल्यात नर्स असलेली एक महिला आज, मंगळवारी सकाळी ‘मॉर्निंग वॉक’साठी गेली होती. घरी परत येत असताना ट्रॅक्टर काळा बनवून आला आणि त्या महिलेचा जीव घेऊन गेल्याची धक्कादायक घटना आज सकाळी गीता नगर येथील हिंगणा मार्गावर घडली. तूर घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली रस्त्यावरून पादचारी जाणाऱ्या महिलेच्या अंगावर उलटली. त्याखाली दबून महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्रतिभा किर्डे असे मृतक महिलेचे नाव आहे. भरधाव वाहतुकीमुळे आता रस्त्यावर ‘मॉर्निंग वॉक’ला जाणे देखील धोकादायक ठरत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पहाटे चालणे हा दिवसाची सुरुवात करण्याचा उत्तम मार्ग. यामुळे दिवसाची सुरुवात चांगली होण्यासोबतच योग्य जीवनशैली राखली जावू शकते. निरोगी वजन राखण्यासाठी आणि एकूणच तंदुरुस्ती सुधारण्यासाठी ‘मॉर्निंग वॉक’ एक उत्तम मार्ग आहे. शहरातील आरोग्य विषयक जागरूक नागरिक सकाळच्या सुमारास आपल्याला विविध मार्गांवर ‘मॉर्निंग वॉक’ करताना दिसून येतात. वर्दळीच्या व भरधाव वाहतूक होणाऱ्या रस्त्यावरील ‘मॉर्निंग वॉक’ आता जीवघेणा ठरत आहे.

अकोल्यात अशाच एका घटनेत महिलेला आपला जीव गमवावा लागला. शहरातील शासकीय रुग्णालयात नर्स असलेली महिला आज सकाळी ‘मॉर्निंग वॉक’साठी घरातून निघाली होती. ‘मॉर्निंग वॉक’ आटोपल्यावर त्या हिंगणा मार्गावरून घरी परत येत होत्या. दरम्यान, मार्गावरून एका ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमधून तुरीची वाहतूक करण्यात येत होती. चालकाचे अचानक ट्रॅक्टरवरील नियंत्रण गेले. त्यामुळे पादचारी महिलेच्या अंगावर ट्रॅक्टरची ट्रॉली उलटून तुरीने भरलेले पोते पडले. त्याखाली दबून महिलेचा घटनास्थळीच दुदैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेची माहिती मिळताच जुने शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनेचा सविस्तर पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आला. जुने शहर पोलिसांनी घटनेची नोंद घेऊन ट्रॅक्टर चालकाला ताब्यात घेतले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

या अगोदर देखील ‘मॉर्निंग वॉक’ला गेल्यावर अपघातबळी

अकोला शहरात या अगोदर देखील ‘मॉर्निंग वॉक’ला गेल्यावर अपघातात पादचाऱ्यांचा बळी गेला आहे. विशेषत: जुने शहर भागातच या प्रकारच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे सतर्क राहण्याची गरज आहे.