अमरावती: राज्य परिवहन महामंडळाच्या अमरावती-परतवाडा या बसने प्रवास करणाऱ्या एका महिलेस धावत्या बसमध्ये हृदयविकाराचा झटका आला. यामध्ये संबंधित महिलेचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी अमरावती शहराजवळील नवसारी परिसरात प्रवासादरम्यान घडली.
एसटी महामंडळाच्या अमरावती आगाराची एमएच ४० / व्ही ५३९३ क्रमांकाची बस सकाळी अमरावतीहून परतवाडा येथे निघाली होती. या बसमध्ये प्रवास करणाऱ्या वृद्ध महिलेला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. महिलेला त्रास होत असल्याचे लक्षात येताच बसचे वाहक-चालक, बसमधील प्रवाशांनी या महिलेला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आणले. रुग्णालयात या महिलेची डॉक्टरांनी तपासणी केली असता मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. मृत पावलेल्या वृद्ध महिलेचे नाव पुष्पा रमेश सोनोने (७०, रा. साऊर) असल्याचे सांगण्यात आले.
हेही वाचा >>>नागपूर : झटपट पैशांचे आमिष! महाविद्यालयीन तरुणींकडून देहव्यापार, ‘हेवन स्पा’मध्ये सेक्स रॅकेट….
ही वृद्ध महिला अमरावतीत शेगाव नाका परिसरात राहणाऱ्या आपल्या मुलीकडे आली होती. ती आपल्या गावी परत जात होती. तिचे जावई नरेंद्र काळे यांनी शेगाव नाका येथून या महिलेला बसमध्ये बसवून दिले. बस समोर गेल्यानंतर नवसारी नजीक बसचे वाहक हे प्रवाशांना तिकीट देण्यात व्यस्त असताना अचानक पुष्पा सोनोने यांना हृदयविकाराचा झटका आला. त्या बेशुद्ध पडल्या. त्यामुळे बसमध्ये एकच खळबळ उडाली. बसच्या चालकाने लगेच बस माघारी फिरवून येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर आणली. प्रवाशांच्या मदतीने या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
हेही वाचा >>>यवतमाळ: संतापजनक! तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार
सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आर्थिक-सामाजिक स्तरांमधील लोकांच्या आयुष्यात मोठे बदल झालेले दिसून येतात. यामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, लठ्ठपणा असे अनेक आजार सर्वच वयोगटातील लोकांमध्ये वाढायला लागले आहेत. त्यामुळे हृदयरोगाचे प्रमाणही वाढले आहे. अशातच कोणाला कधी, कुठे हृदयविकाराचा झटका येईल हे सांगता येत नाही.
एसटी बसने प्रवास करणाऱ्या एका महिलेलाही अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने प्रवासादरम्यान आपले प्राण गमवावे लागले आहेत. प्रवासी तिकीट खरेदी करत असतानाच या महिलेला मृत्यूने कवटाळले. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.
बस चालवत असतानाच चालकाचा हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गेल्या महिन्यात बंगळुरुत घडली होती. यशवंतपूरजवळ बस चालवताना हृदयविकाराच्या झटक्याने बंगळुरू मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनच्या चालकाचे निधन झाले होते.