वृद्धाश्रमात राहणा-या महिलेला मुलाच्या भेटीची ओढ लागली होती. ती मृत्यूशय्येवर होती. मुलाला अखेरच्या क्षणी पहावे, त्याच्या हातून चहा प्यावा, ही तीची अखेरची इच्छाही पूर्ण होऊ शकली नाही.निरोप पाठवूनही मुलगा आला नाही. तिने अखेरचा श्वास घेतला. वृद्धाश्रमाच्या परिसरातच त्या वृद्ध महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. अचलपूर तालुक्यातील शेकापूर जवर्डी येथील परतवाडा-सापन बहुउद्देशीय संस्थेच्या विसावा वृद्धाश्रमात शकुंतलाबाई पळसपगार (वय ७५) गेल्या काही महिन्यांपासून वास्तव्याला होत्या. १७ ऑगस्टला शिरजगाव कसबा पोलीस ठाण्याच्या रस्त्याच्या कडेला त्या पडलेल्या अवस्थेत दिसून आल्या होत्या. त्यांच्या डोक्याला मार लागला होता.
पोलिसांनी त्यांना अचलपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारानंतर विसावा वृद्धाश्रमात आणण्यात आले. या ठिकाणी वृद्धाश्रमाचे ऍड. भास्कर कौतिककर, व्यवस्थापक सचिन वानखडे आणि त्यांच्या सहका-यांनी शकुंतलाबाईंची सुश्रृषा केली. तीन महिन्यांपासून वृद्धाश्रमातच वास्तव्याला होत्या. पण त्यांना घरची आठवण येत होती. मूळच्या फुबगाव येथील शकुंतलाबाईंना दोन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार असूनही त्यांना परत घ्यायला कुणीही आले नाही. त्यांच्या मुलांनीही तिचा सांभाळ करण्यास नकार दिला.
हेही वाचा:पतीलाही पत्नीकडून खावटी मागण्याचा अधिकार; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय
त्यामुळे वृद्धाश्रमातच त्यांना रहावे लागले.कुटुंबापासून दूर राहणे, त्यांना सहन होत नव्हते. त्या मानसिकदृष्ट्या खचल्या होत्या. मनोहरच्या (मुलाच्या) घरी चहा प्यायला जायचे आहे, असा त्या कायम म्हणत होत्या. पण, त्यांची आर्त हाक शकुंतलाबाईंच्या मुलांपर्यंत पोहचू शकली नाही.गेल्या आठ दिवसांपासून शकुंतलाबाईंची तब्येत खालावली होती. त्या मृत्यूशय्येवर असल्याची माहिती कुटुंबीयांना देण्यात आली, पण त्यांच्या भेटीस अखेरच्या क्षणीही कुणी आले नाही.शकुंतलाबाईनी मुलाच्या नावाचा जप सुरू केला. मरण्याआधी मुलाला एकदा पहावे, त्याच्या हातून चहा घ्यावा, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. त्यावेळी भास्कर कौतिककर यांनी मीच मनोहर असल्याचे सांगून शकुंतलाबाईंना थोडा चहा व दूध दिले.
मंगळवारी दुपारी शकुंतलाबाईंनीं विसावा वृद्धाश्रमातच शेवटचा श्वास घेतला. वृद्धाश्रमाच्या बाहेर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत्यूनंतर मात्र त्यांचा पूर्ण परिवार अंत्यसंस्काराला उपस्थित होता. वृद्धाश्रमातील वृद्धांनी अंत्यसंस्कार करत त्यांना निरोप दिला.अंत्यसंस्कार करण्यासाठी माहेर फाऊंडेशनच्या सदस्या माजी नगरसेविका दिपाली विधळे, अचलपूर येथील राहुल साडी सेंटरचे संचालक राहुल अग्रवाल यांनी सहकार्य केले. यावेळी वृध्दाश्रमाचे अध्यक्ष पुंडलिकराव भुजाडे, जानराव कौतिककर, माहेर फाऊंडेशनच्या दिपा तायडे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.