यवतमाळ : ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ कायम तत्पर असलेल्या राज्य परिवहन महामंडळातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना काय झाले? असा प्रश्न सध्या यवतमाळ जिल्ह्यात चर्चेत आहे. दोन दिवसांपूर्वी उमरखेड आगारातून अल्पवयीन मुलीस सोबत नेत तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी बस चालकास अटक करण्यात आली. ही घटना ताजी असतानाच महिलेशी लगट करणाऱ्या एका महिलेने अधिकाऱ्याच्या श्रीमुखात भडकावत, एसटीचे अधिकारी आहेत म्हणून कुठेही सेवेची संधी घेवू नका, असा दम भरला.

राज्य परिवहन महामंडळात जबाबदारीच्या पदावर असलेला हा अधिकारी कोणतीही ‘नीती’नसल्याप्रमाणे ‘कुमार’वयीन चाळे करत आहे. त्याच्या कारनाम्यांची चर्चा दारव्हा आगारात कायमच सुरू असते. नको तेथे हुल्लडबाजी करण्याची जणू सवयच या अधिकाऱ्यास लागली आहे. लाचखोरीच्या प्रकरणात सध्या हा अधिकारी साधारण आगारात शिक्षा भोगत असल्याचे सांगण्यात येते.

राज्य परिवहन महामंडळ शिस्तीचे खाते समजले जायचे. मात्र अलिकडच्या काळात या महामंडळातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कारनाम्यांनी महाराष्ट्राचा गौरव असलेल्या एसटीची मान मात्र शरमेने खाली जात आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीतून एसटीची प्रतिमा मलीन होत असल्याची ओरड सुरू आहे. सध्या कनिष्ठ कर्मचार्‍यांना ‘टार्गेट’ ठरवून त्रास देणे ऐवढेच ‘लक्ष्य’ काही अधिकार्‍यांनी ठेवल्याची चर्चा यवतमाळ जिल्ह्यात आहे. अशाच प्रकरणात दोन महिला कर्मचार्‍यांच्या तक्रारीमुळे जिल्हा बाहेर हाकलून दिलेला पण, ‘नीती’ गमावलेला एक अधिकारी आपल्या मूळ स्वभावानुसार वागत असल्याने दारव्हा आगार चर्चेत आले आहे.  या अधिकाऱ्याने शहरातील एका नामांकित आणि भरवस्तीत असलेल्या बँकेत कामानिमित्त गेल्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या एका महिलेशी असभ्य वर्तन करत ‘लगट’ करण्याचा प्रयत्न केला.

 या अधिकाऱ्याची नितीमत्ता लक्षात आल्याने संबंधित महिलेने त्याची कॉलर पकडत त्याला बँकेच्या बाहेर ओढत नेले. तेथे उपस्थित नागरिकांसमोर त्याच्या श्रीमुखात भडकावत चांगलाच चोप दिला. महिलेचा मार खात असल्याने बोलण्याची कोणतीच ‘उजा’गरी नसलेल्या अधिकाऱ्यास तेथच उपस्थित असलेल्या एसटी महामंडळातील एका वरिष्ठ कर्मचाऱ्याने मध्यस्थी करून सोडविले. महिलेने त्याचा कारनामा नागरिकांना सांगताच अनेकांनी त्या अधिकाऱ्याला खडे बोल सुनावले. त्याच्या पदाची गरिमा राखली जावी म्हणून हे प्रकरण पोलिसांत गेले नाही. मात्र जनतेच्या दरबारात त्या अधिकाऱ्याची प्रतिमा मलीन झाली.

त्यानंतर काही झालेच नाही, अशा अविर्भावात हा अधिकारी बँकेच्या परिसरातून ‘तोंड’ लपवत निघून गेला. महिलेचा मार खाणारा हा अधिकारी कोण, याची चर्चा दिवसभर दारव्हा आगारात व बसस्थानकावर सुरू आहे. हा सर्व प्रकार होऊनही वरिष्ठ या प्रकरणात मुग गिळून बसल्याने या अधिकाऱ्याची हिंमत अधिक वाढेल, अशी चर्चा आहे. यापूर्वीसुद्धा या अधिकाऱ्यावर महिलांना त्रास दिल्याचा आरोप आहे. दारव्हा आगार पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातील असल्याने ही वार्ता त्यांच्याही कानी गेली आहे. आता ते या बाबतीत काय निर्णय घेतात, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.