अकोला : समाज माध्यमावर तरुण-तरुणीची ओळख झाली. या ओळखीतून भेटी-गाठी त्यातून प्रेम निर्माण झाले. कुटुंबीयांचा विरोध असतानाही दोघांनी प्रेम विवाह केला. मात्र, पुढे नको तेच घडले. काही महिने सुरळीत गेल्यानंतर पती व सासरच्यांकडून विवाहितेचा दुचाकी आणि पैशांसाठी शारीरिक, मानसिक छळ सुरू झाला. सहनशक्तीचा अंत झाल्याने विवाहितेने पोलीस ठाण्यात धाव घेतली. विवाहितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी पतीसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

समाज माध्यमे तरुणाईच्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग बनला आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तरुणाई समाज माध्यमावर सक्रिय असते. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअप, युट्युब अशा माध्यमांचा वापर करण्यात आजची तरुण पिढी अग्रेसर आहे.

या आभासी जगातून मैत्रीचे नाते जोडल्या जाते. तरुण व तरुणीमधील आकर्षणातून प्रेम संबंध सुरू होण्याचे प्रकार अनेक वेळा घडतात. कुटुंब व समाज यांचा विरोध पत्करून जोडपे विवाह बंधनात देखील अडकतात. मात्र, हे नाते फार काळ टिकत नाही. टोकाची भूमिका घेतली जाते. असाच एक प्रकार अकोला जिल्ह्यात समोर आला आहे. समाज माध्यमातील ओळखीतून प्रेम व त्यानंतर जोडप्याने विवाह केला. मात्र, काही दिवसांतच विवाहितेचा छळ सुरू झाला. प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले.

गीता पवन आठवले (वय २३, ह.मु, जवळा बु., ता.जि. अकोला) यांनी बोरगांवमंजू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांचे पती पवन वसंता आठवले (रा. पिंप्री, ता. कारंजा, जि. वाशीम) यांच्यासोबत समाजमाध्यमातील ओळखीनंतर त्यांनी १० सप्टेंबर २०२२ रोजी अकोला येथे विवाह केला.

पतीच्या कुटुंबीयांनी हा विवाह मान्य केला नाही. लग्नानंतर काही दिवसांनीच पती व सासरच्या मंडळींनी दोन लाख रुपये व एक बुलेट गाडीच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ सुरू केला. सासू पद्मा आठवले यांनी जबरदस्ती घरकाम करून घेतले आणि अन्नातून विषबाधा करून गर्भपात घडवून आणल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. अमरावती येथे बोलावून शिवीगाळ व मारहाण केल्याचेही फिर्यादीत नमूद केले. सासरच्यांनी तडजोडीस नकार दिल्याने अखेर विवाहितेने बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पती पवन आठवले, सासू पद्मा आठवले, सासरचे रोहन आठवले, पवनचा चुलत जावई धम्मदीप तायडे आणि दीक्षा तायडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Story img Loader