नागपूर : महाठग अजित पारसेने अनेकांचा ‘हनिट्रॅप’ करून फसवणूक केल्यानंतर अनेकांकडून कोट्यवधींमध्ये खंडणीची रक्कम उकळली. ती रक्कम अद्यापपर्यंत पोलिसांच्या तपासात समोर आली नाही. त्यामुळे अजित पारसेच्या संपर्कात असलेल्या अनेक महिला, तरुणींच्या बँक खात्यात ती रक्कम असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता पारसेच्या संपर्कात असलेल्या महिला-तरुणीही अडचणीत येणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पारसेने अनेकांना संकेतस्थळ बनवण्यासाठी आणि ‘ऑनलाईन प्रमोशन’ करून देण्याच्या नावावर जाळ्यात ओढले आहे. त्यांच्याकडून या कामासाठी मोठमोठी रक्कम उकळली आहे. शहरातील अनेक डॉक्टर, व्यापारी, उद्योजक आणि संस्था – चालकांना पंतप्रधान कार्यालयातून सामाजिक दायित्व निधी (सीएसआर फंड) मिळवून देण्याच्या नावाखाली १५ ते २० टक्के कमिशन म्हणून लाखोंमध्ये रक्कम घेतली होती.
हेही वाचा: नागपूर: महाठग अजित पारसेने नेतापुत्राला घडवले ‘दिल्ली दर्शन’
तसेच त्याने अनेकांना दिल्लीतील हॉटेलमध्ये नेऊन त्यांचे अश्लील छायाचित्र समाज माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देऊन लाखो रुपये उकळल्याचेही पोलीस तपासात समोर आले आहे. पारसेने उकळलेल्या खंडणीतील रक्कम त्याच्या तरुणी आणि महिला मित्रांच्या खात्यात टाकल्याची किंवा त्यांच्याकडे दिल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे पारसेच्या संपर्कात असलेल्या खास तरुणी व महिलांची पोलीस चौकशी करणार असल्याची चर्चा आहे.
नागपूर: अजित पारसेच्या न्यायालयीन अडचणीत वाढ
जामिनावर आज सुनावणी
अजित पारसेने अटक टाळण्यासाठी न्यायालयात जामीन अर्ज केला आहे. बुधवारी पारसेच्या जामिनावर सुनावणी झाली. त्याच्या वकिलाने न्यायालयाला वेळ मागितला. त्यामुळे पारसेच्या जामिनावर आता गुरुवारी दुपारी सुनावणी होणार आहे. न्यायालयाने पारेसचा जामीन फेटाळल्यास पोलिसांना अटकेचा मार्ग मोकळा होणार आहे.