लोकसत्ता टीम
अकोला : मकरसंक्रांती सणाचा अविभाज्य भाग असलेला पतंगबाजीचा खेळ आता सर्वसामान्यांच्या जीवावर उठल्याचे चित्र आहे. नायलॉन मांजाला रोखण्यात प्रशासन अपयशी ठरले. या मांजामुळे शहरात एका महिलेचा पाय कापल्या गेला. उपचारामध्ये महिलेच्या पायाला तब्बल ४५ टाके लागले आहेत.
मकर संक्रांतीनिमित्त लहान-मोठ्यांपासून सर्व जण पतंग उडवण्याचा आनंद घेतात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून पतंगबाजीसाठी मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजाचा वापर वाढला आहे. हा नायलॉन मांजा प्रतिबंधित असतांनाही त्याची सर्रासपणे विक्री होते. प्रशासनाकडून केवळ कारवाईचा देखावा होत असल्याचा आरोप नागरिकांमधून झाला.
आणखी वाचा-‘नथुराम गोडसे’ला असांसदीय शब्दांच्या यादीतून वगळा… संघ भूमीतून…
या नायलॉन मांजाचा वापर नागरिकांच्या जीवावर उठल्याचे विविध घटनांवरून अधोरेखित होते. अकोल्यातील जुने शहर भागातील गुरुदेव नगर येथे नायलॉन मांजामुळे एका महिलेचा पाय कापल्या गेल्याची दुर्दैवी घटना घडली. या भागातील रहिवासी कलावती मराठे यांच्या पायात नायलॉन मांजा अडकला. त्या मांजामुळे त्यांचा पाय चांगलाच कापल्या गेला. त्यामध्ये महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. मांज्यामुळे महिलेच्या पायाला खोल जखम झाली. त्यामुळे उपचारादरम्यान महिलेच्या पायाला चक्क ४५ टाके पडले आहेत.
नायलॉन मांजाच्या वापर, साठवणूक आणि विक्रीवर बंदी असतानाही त्याची सर्रास विक्री व वापर होत आहे. महापालिका, जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग नायलॉन मांजा विरोधात कारवाईची मोहीम राबवत असतांनाही सर्वसामान्यांच्या हातात नायलॉन मांजा येतोच कसा? हा खरा संशोधनाचा विषय ठरत आहे.
आणखी वाचा-जयंत पाटीलांविरुद्ध पक्षातूच मोहीम, प्रदेश प्रवक्ते प्रवीण कुंटे-पाटील यांचा आरोप
…तर दंडात्मक आणि पोलीस कारवाई
नायलॉन मांजामुळे नागरिकांसह पक्ष्यांना होणारी इजा व अपघात टाळण्यासाठी मनपा क्षेत्रात स्वच्छता निरीक्षकांमार्फत पतंग, मांजा विक्री करणारे दुकानदार तसेच संशयीत नागरिकांची तपासणी केली जात असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. महिन्याभरात सुमारे २०० व्यावसायिक प्रतिष्ठाने, संशयित घरे आणि पतंग उडविणाऱ्यांच्या रीलची तपासणी करण्यात आली आहे. ८० प्रतिबंधित मांजाची रील जप्त करून संबंधितांवर ४२ हजार ५०० रुपयांची दंडात्मक कारवाई केली. प्रतिबंधित नायलॉन मांजाचा वापर टाळून पंतागोत्सव साजरा करण्याचे आवाहन महापालिकेने केले. शहरातील प्रत्येक पतंग उडविणाऱ्यांच्या रीलची तपासणी केली जात आहे. प्रतिबंधित मांजा आढळून आल्यास मांजा जप्त करून त्यांचे विरूद्ध दंडात्मक आणि पोलीस कारवाई केली जात असल्याचे अकोला महापालिकेने स्पष्ट केले.