नागपूर : गृहमंत्र्यांच्या शहरात मुली व महिला सुरक्षित नसल्याची घटना समोर आली. एका युवकाने भरदुपारी रस्त्यावरच विद्यार्थिनीशी लगट करीत लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांनी वेळीच सतर्कता दाखवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणी पोलिसांनी विद्यार्थिनीच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करुन अटक केली. शोएब रहिम बेग (२७, भालदारपुरा, गणेशपेठ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी १५ वर्षीय मुलगी ही दहावीची विद्यार्थिनी आहे. ती रोज गणेशपेठमधून घराकडे जाते. त्याच रस्त्यावर आरोपी शोएब रहिम बेग हा उभा राहून तिची नेहमी छेड काढत होता. तिचा पाठलाग करुन तिच्यावर शेरेबाजी नेहमी करीत होती. तिने अनेकदा त्याच्या कृत्याकडे दुर्लक्ष केले. सध्या पेपर सुरु असल्यामुळे दुपारी घरी जात होती. महिला दिनी शनिवारी दुपारी ती शाळेतून घरी जात असताना आरोपी शोएब रहिम बेग याने तिचा पाठलाग केला. भररस्त्यावर तिला अडवले आणि तिला गुलाबाचे फुल देण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थिनीने त्याला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे चिडलेल्या शोएबने तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे विद्यार्थिनीने आरडाओरड केला. त्यामुळे नागरिकांनी चौकात धाव घेतली. शोएबला चांगला चोप दिला आणि गणेशपेठ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळावर पोहचून आरोपीला ताब्यात घेतले. मुलीच्या तक्रारीवरुन शोएबविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याला अटक करुन उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
महिला दिनीच घडली घटना
एकीकडे संपूर्ण जगात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करीत असतानाच मुख्यमंत्र्याच्या शहरात विद्यार्थिनीशी भरचौकात अश्लील चाळे करण्यात आले. विद्यार्थिनीशी लगट करुन तिच्याशी बळजबरी करण्यात आली. नागरिकांनी सतर्कता दाखविल्यामुळेच अनर्थ टळला. मात्र, या घटनेमुळे नागपुरातील महिलासह विद्यार्थिनीसुद्धा सुरक्षित नसल्याचे चित्र निर्माण झाले. पिडित विद्यार्थिनी इतकी घाबरली होती, की तिला पोलीस ठाण्यात तक्रार देतानासुद्धा दहशतीत होती. शहरातील कायदा व सुव्यवस्था किती बिघडल्याचा अंदाज बांधता येते.
गेल्या दोन महिन्यात ४० वर घटना
नागपूर शहर आयुक्तालयात जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यात मुली-महिलांवरील लैंगिक अत्याचार आणि विनयभंगाच्या ४० पेक्षा जास्त घटना घडल्याची नोंद आहे. त्यामुळे शहरातील पोलिसांच्या गस्तप्रणालीवरही संशय निर्माण झाला आहे. पोलिसांची डीबी पथके सध्या तपासापेक्षा वसुलीवर भर देत आहेत. रस्त्यावर पोलीस कर्मचारी दिसत नसल्यामुळे महिला-तरुणींशी गैरवर्तनाच्या घटना सातत्याने समोर येत आहेत.