‘एसटी’च्या एका महिला कर्मचाऱ्याने विभाग नियंत्रकाच्या विरोधात महामंडळासह महिला आगोकाकडे तक्रार केली होती. त्याची गंभीर दखल घेत आयोगाचे अधिकारी व सदस्य सोमवारी अचानक या कार्यालयात धडकले. येथील विशाखा समिती निष्क्रिय असल्याचे पुढे आल्याने त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.

‘एसटी’च्या विभागीय कार्यालयात सोमवारी पोहचलेल्यांमध्ये महिला आयोगाच्या सदस्या आभा बिज्जू पांडे, महिला आयोगाच्या विभागीय कार्यालयाच्या उपायुक्त अपर्णा कोल्हे आणि इतरही काही अधिकाऱ्यांचा समावेश होता. येथे पोहचल्यावर त्यांनी पूर्वा एसटीच्या अधिकाऱ्यांनी आपल्या आस्थापनेत किती महिला आहे? याची माहिती घेतली. त्यानंतर काही महिलांशी थेट संवाद साधला. विभाग नियंत्रकांना त्यांनी येथील विशाखा समितीबाबत विचारना केली. त्यात येथे सप्टेंबर २०२२ पासून समितीची एकही बैठक झाली नसल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला. त्यावर अधिकाऱ्यांची कानउघाडणी करत तातडीने समितीची २४ तासांत बैठक घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

हेही वाचा >>> राज्यात गेल्या नऊ महिन्यात वाघाचे आठ बछडे मृत्युमुखी; वाघांची संख्या वाढली, पण मृत्युचे प्रमाणही वाढले

ही समितीच नसल्याने येथील एका महिला कर्मचाऱ्याने केलेल्या तक्रारीवरील चौकशीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दरम्यान समितीने तातडीने या महिलेच्या प्रकरणात केलेल्या चौकशीहा अहवाल आयोगाच्या सदस्यांसह आयोगाला तातडीने सादर करण्याची सूचना केली. या अहवालातील विविध मुद्यांवर बारकाईने चौकशी केल्यावर शेवटी समितीकडून पुढील कारवाई निश्चित होणार आहे. या प्रक्रियेनंतर आयोगाच्या सदस्याने आंदोलक महिला कर्मचाऱ्याची त्यांच्या उपोषण मंडपात भेट घेत या प्रकरणात योग्य चाैकशीचे आश्वासन दिले. सोबत महिलेला उपोषण मागे घेण्याची विनंतीही केली.

महिलेच्या तक्रारीची दखल घेत विभागीय कार्यालयातील संबंधित महिलेसह इतरही महिलांशी संवाद साधला. एसटीकडून झालेल्या चौकशीचा अहवाल मागितला आहे. येथे कायद्याने बंधनकारक विशाखा समिती निष्क्रिय असल्याचे पुढे आले. तातडीने ही समिती गठीत करून बैठकीची सूचना केली. एसटीचा अहवाल बघून आता पुढील कारवाई निश्चित केली जाईल.

– आभा बिज्जू पांडे, सदस्य, महिला आयोग.

महिला आयोगाच्या सदस्यांनी विभाग नियंत्रक कार्यालयाला भेट दिली असून त्यांच्या सूचनेनुसार विशाखा समितीला तातडीने मंगळवारी बैठक घेण्याची सूचना केली आहे. आयोगाच्या सूचनेनुसार हे प्रकरण आता समितीकडे वर्ग करून योग्य कार्यवाही केली जाईल. – श्रीकांत गभने, उपमहाव्यवस्थापक, एसटी महामंडळ.