भंडारा : दी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक मुख्य शाखेकडून कसल्याही प्रकारचे कर्ज घेतले नसताना वसुली अधिकाऱ्याने दुकान मालकाच्या अनुपस्थितीत दुकानाला सील केल्याची तक्रार रूपाली भुरे या व्यावसायिक महिलेने केली आहे. बेकायदेशीरपणे दुकानास केलेले ‘सील’ २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत काढण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी अर्बन बँक यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रूपाली शिशुपाल भुरे या महिला व्यावसायिकाचे म्हाडा कॉलनी, खात रोड भंडारा येथे शिशुपाल ऑटोमोबाईल्स हे प्रतिष्ठान असून, त्यात दुचाकी वाहनाचे सुटे भाग विक्री व दुरुस्तीचे काम केले जाते. याकरिता ४ कर्मचारी कामास आहेत. या व्यवसायासाठी इंडियन ओव्हरसिज बँक व श्रीराम सिटी बँक यांच्याकडून अर्थसाहाय्य घेतले होते. पण महाशिवरात्रीनिमित्त ही व्यावसायिक महिला बाहेरगावी यात्रेस गेली असता १९ फेब्रुवारी रोजी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या नावाने सील लावले असल्याचे व त्यात कर्जवसुली दंडात्मक कारवाई अशी नोटीस दुकानाला चिकटवलेले २१ फेब्रुवारी रोजी परत आल्यावर कळले.

हेही वाचा – अमरावती : भरधाव एसटीची दुचाकीला धडक, पाच वर्षीय बालक ठार, नागरिकांकडून दीड तास रास्ता रोको

हेही वाचा – अकोला : लॉकरमधून दागिने काढले अन् काही मिनिटांत गायब झाले..

या महिला व्यावसायिकाने दी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे कोणत्याही प्रकारचे कर्ज घेतले नाही किंवा कोणत्याही कर्जदाराच्या जामीनदार नाहीत. पण, बँकेने कसलीही सूचना न देता गैरहजेरीत माझ्या प्रतिष्ठानास सील ठोकलेले आहे. असे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या पत्रात महिला व्यावसायिकाकडून नमूद केले आहे. या बेकायदेशीर कारवाईमुळे त्यांना मानसिक आघात, सामाजिक बदनामी व आर्थिक नुकसान होत आहे. त्याला सर्वस्वी जबाबदार अर्बन बँकेचे वसुली अधिकारी असून त्यांच्यावर उचित कारवाई करून दुकानाला लावलेले सील काढून अर्बन बँकेने माफी मागावी, अशी मागणी रूपाली यांनी केली आहे. याकरिता महिला व्यावसायिक रूपाली शिशुपाल भुरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक भंडारा यांच्याशी पत्रव्यवहार केला असून, बँकिंग लोकपाल रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया वरळी मुंबई, पोलीस ठाणे भंडारा व शाखा व्यवस्थापक अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक मुख्य शाखा गांधी चौक भंडारा यांच्याकडे प्रतिलिपी पाठवण्यात आल्या आहेत. दरम्यान, महिलेच्या पतीने काही दिवसांपूर्वी बँकेतून कर्ज घेतले होते. त्याने परतफेड न केल्याने बँकेने ही कारवाई केल्याचे समजते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women complaint against urban cooperative bank bhandara for sticking notice on shop ksn 82 ssb