अकोला : देशाच्या स्वातंत्र्योत्तर काळात १९८५ ते २०२४ पर्यंत १० थोर महिलांनी भारतीय नाण्यांवर छाप सोडली. राणी व्हिक्टोरिया यांचे छायाचित्र असलेले जगातील एकमेव सोन्याचे नाणे १८४१ साली काढण्यात आले होते. या नाण्याचे वजन १०.६६ ग्रॅम होते. त्यानंतर जगातील कोणत्याही देशाने सोन्याचे नाणे काढले नाही, अशी माहिती मुद्रा अभ्यासक अक्षय खाडे यांनी जागतिक महिला दिनानिमित्त दिली.
चलनांवरील महिलांच्या छायाचित्राबाबत माहिती देताना अक्षय खाडे म्हणाले, १९७५ साली भारत सरकारने दहा पैशांच्या चलनी नाण्यावर महिलेचे काल्पनिक चित्र काढून ते प्रसारित केले. त्यावर समानता, विकास, शांती हे वाक्य छापण्यात आले होते. त्यानंतर १९८० साली १० व २५ पैशांच्या नाण्यांवर महिलेचे काल्पनिक चित्र काढून त्यावर ‘ग्रामीण महिलाओ की प्रगती’ असे छापले होते. १९८५ साली ५० पैसे व पाच रुपयांचे नाणे काढून त्यावर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे छायाचित्र उमटवले होते. त्यानंतर एकदम २४ वर्षानंतर २००९ साली पाच रुपये व १०० रुपयांच्या विशेष नाण्यावर ‘सेंट अल्फोंसा’ यांचे छायाचित्र छापण्यात आले.
कॅथोलिक चर्चद्वारा संत उपाधी दिलेल्या त्या पहिल्या भारतीय महिला होत्या. यानंतर २०१० साली पाच रुपये व १०० रुपयांच्या विशेष नाण्यावर मदर टेरेसा यांचे छायाचित्र, २०१४ साली पाच रुपये व १०० रुपयांच्या विशेष नाण्यावर प्रख्यात गायिका व अभिनेत्री बेगम अख्तर यांचे छायाचित्र, २०१५ साली स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटिशांच्या विरोधात लढलेल्या राणी गायी दिन्यालु यांचे छायाचित्र पाच व १०० रुपयांच्या विशेष नाण्यावर छापण्यात आले होते. २०१६ मध्ये पाच व १०० रुपयांच्या विशेष नाण्यावर प्रख्यात गायिका एम. एस. सुब्बू लक्ष्मी, २०२० साली १०० रुपयांच्या विशेष नाण्यावर विजया राजे सिंधिया, २०२३ साली ५२५ रुपयांच्या विशेष नाण्यावर संत मीराबाई, त्याच वर्षी ५०० रुपयांच्या विशेष नाण्यावर राणी दुर्गावती व २०२४ मध्ये १०० रुपयांच्या विशेष नाण्यावर सहज योगाच्या पुरस्कर्त्या निर्मलादेवी यांचे छायाचित्र प्रसिद्ध केले.
इतरही देशाच्या चलनांवर महिलांचा सन्मान
संपूर्ण जगात २०० पेक्षाही जास्त देश आहेत. त्यातील इंग्लंड, ऑस्ट्रेलिया व न्युझीलँड यांच्या चलनी नोटांवर राणी एलिझाबेथ, कॅनडातील नोटांवर व्हिओला डिस्मंड यांची छायाचित्रे आहेत. इतरही काही १० ते १५ टक्के देशांच्या नोटा व नाण्यांवर त्या देशातील थोर महिलांची छायाचित्रे प्रसिद्ध झाली, असे अक्षय खाडे यांनी सांगितले.