एका तरुणीने प्रेमासाठी नकार दिल्याने तिचे अश्लील छायाचित्र फेसबुकवर टाकून ते काढण्यासाठी ५० हजार रुपयांची खंडणी मागण्याचा प्रकार जरीपटका पोलीस ठाण्यांतर्गत उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दीपक मतलाने असे आरोपीचे नाव आहे.
पीडित मुलगी मूळची गोंदिया जिल्ह्य़ातील असून नागपुरात शिक्षणासाठी आली आहे. सध्या ती मावशीकडे राहाते. तिच्या मावशीच्या मुलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात आरोपी आला होता. तेव्हापासून तो पीडित १९ वर्षीय तरुणीच्या मागे लागला. तिच्या मामेबहिणीकडून तिचा मोबाईल क्रमांक मिळवला आणि त्या भ्रमणध्वनी क्रमांकावरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला. तिला त्याची खरी ओळख पटल्यानंतर तिने त्याच्याशी बोलणे बंद केले. तो संतापला. त्याने बनावट फेसबुक अकाऊंट तयार करून तिचे अश्लील छायाचित्र प्रसिद्ध केले. तिने त्याला ते काढण्याची विनंती केली असता तो शिवीगाळ करून ५० हजार रुपयांची खंडणी मागू लागला. तिने आपल्या मावशीला सर्व हकिगत सांगितली. त्यांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.