यवतमाळ : महिलांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन आजही दुय्यमच आहे. ‘त्या’ घरात आणि बाहेरही सुरक्षित नसल्याचे गेल्या वर्षीच्या महिला संदर्भातील गुन्ह्यांच्या आकडेवारीवरून दिसत आहे. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या वर्षभरात महिला व अल्पवयीन मुलींवर अत्याचार, विनयभंगाचे ७१५ गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणांत ४७९ आरोपींना अटक झाली, मात्र या घटनांतील २५० आरोपी अद्यापही पोलिसांना सापडले नाहीत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिल्ह्यात महिलांच्या विनयभंगाचे ३९७ गुन्हे दाखल झाले. यातील ३९६ गुन्हे उघड झाले. या प्रकरणातील ३७७ आरोपींपैकी केवळ १७७ आरोपींना अटक करण्यात आली. या घटनांतील २५० आरोपी अद्यापही मोकाट आहेत. महिला अत्याचाराचे १४८ गुन्हे दाखल करण्यात आले. यातील १४७ गुन्हे उघड झाले. यातील १८९ आरोपींपैकी १६५ आरोपींना अटक करण्यात आली. २४ आरोपींचा शोध अद्यापही लागला नाही.

हेही वाचा – वाशिम : भावी खासदार म्हणून डंका पिटणाऱ्या नेत्यांना तंबी! शिवसेना ठाकरे गटाकडून…

अल्पवयीन मुलींवरील विनयभंगाच्या ९२ तक्रारी दाखल होऊन सर्व उघड झाल्या. यातील ७७ पैकी ७१ आरोपींना अटक करण्यात आली. मात्र सहा आरोपी अद्यापही गवसले नाहीत. अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या ७८ घटना घडल्या. या सर्व घटना उघडकीस येऊन ८८ पैकी ६६ आरोपींना अटक करण्यात आली. या गुन्ह्यातील २० आरोपी अद्यापही मोकाट आहेत.

समाज आधुनिक होत आहे, तितकेच महिलांवरील अत्याचारही वाढत असल्याचे या घटनांवरून दिसत आहे. हे वाढते अत्याचार समाजासाठी चिंतेची बाब ठरत आहे. महिलांवर शारीरिक, मानसिक आणि भावनिक अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे. कौटुंबिक हिंसाचार, अत्याचार, विनयभंग, हुंडाबळी, सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या, या घटना सातत्याने घडत आहे. दुर्दैवाने मोठ्या शहरात घटना घडली तर त्या विरोधात आवाज उठवला जातो, अंतर ग्रामीण भागात अशा घटना अनेकदा पोलीस ठाण्यांपर्यंतही पोहोचत नाही. धक्कादायक बाब म्हणजे, महिला अत्याचाराच्या गुन्ह्यात जवळचे नातेवाईक, परिचायतील व्यक्तीचा सहभाग अधिक आढळून आला आहे. अल्पवयीन मुलींच्या बाबतीतही हाच प्रकार घडत आहे.

हेही वाचा – निवडणुकीच्या फेऱ्यात अडकली ‘पणन’ची कापूस खरेदी!

दिव्यांग महिला व मुली प्रतिकार करू शकत नसल्याने त्यादेखील अत्याचाराला बळी पडत आहे. गेल्या महिन्यात यवतमाळ शहरात पॉश कॉलनीत एका दिव्यांग महिलेवर नराधमाने अत्याचार केला. मात्र पोलीस अद्यापही आरोपीपर्यंत पोहोचू शकले नाही.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women girls are vulnerable in yavatmal 715 offenses of torture molestation nrp 78 ssb