लोकसत्ता टीम

यवतमाळ : पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा आवळून खून केला व मृतदेह ब्लँकेटमध्ये बांधून अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथे रुळावर टाकला. ही घटना शुक्रवारी उघडकीस आली. गजानन राठोड (४२, रा.पहुर (दाभा) ता.बाभूळगाव, जि. यवतमाळ) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी दत्तापूर (ता. धामणगाव रेल्वे) पोलिसांनी पत्नी व तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले आहे. धामणगाव रेल्वे येथील मध्य रेल्वेच्या रेल्वे रुळावर ब्लँकेटमध्ये बांधून असलेला संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला.

पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवून घटना उघडकीस आणली. पहूर (दाभा) येथील गजानन राठोड याचा विवाह तिवसा तालुक्यातील वीरगव्हाण येथील गंगाशी झाला होता. लग्नानंतर काही काळत कौटुंबिक कारणाने गंगा तीन वर्षे माहेरी होती. दरम्यानच्या काळात वीरगव्हाण येथील सचिन श्रावण राठोड (३०) याचे गंगाशी सूत जुळले. कौटुंबिक कलह मिटल्याने गंगा पुन्हा सासरी आली. दरम्यान, सचिन व गंगा यांच्या प्रेमसंबंधाची कुणकुण गजानन राठोड याला लागली होती. त्यामुळे सचिन राठोड व मृताची पत्नी गंगा यांनी संगनमत करून गजानन राठोड याला संपविण्याचा कट रचला.

आणखी वाचा-यवतमाळ : महाराष्ट्रात दिव्यांगांची वारी प्रथमच विठ्ठलाच्या दारी, दृष्टीहिन यवतमाळातून पंढरपूरला जाणार

२० जून रोजी मध्यरात्री सचिन पहूर येथे गेला. गजाननच्या पत्नीने त्याला गुपचूप घरात घेतले. घरात शिरताच सचिनने झोपून असलेल्या गजाननचा गळा आवळला. सचिन व गंगा या दोघांनीही गजाननचा जीव गेल्याची खात्री केली. त्यांनतर शुक्रवारी पहाटे गजाननचा मृतदेह ब्लँकेटमध्ये बांधून दाभा पहूर येथून दुचाकीने धामणगाव रेल्वे येथे आणला. शहराबाहेरील बायपास रस्त्यावरील रेल्वे पुलावरून मृतदेह अप रेल्वे रुळावर फेकला. सकाळी या मार्गावर काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यास ब्लँकेटचे हे गाठोडे दिसले. त्याने रेल्वे पोलिसांना ही माहिती दिली. पोलिसांनी हे गाठोडे उघडून बघितले असता त्यात मृतदेह आढळला. त्यानंतर या खूनाची वाच्यता झाली.

आणखी वाचा-सुवर्णवार्ता! सोन्याच्या दरात २४ तासांत मोठी घसरण; ‘हे’ आहेत आजचे दर…

कृषी केंद्राच्या पावतीवरून मृताची ओळख

शुक्रवारी रेल्वे कर्मचाऱ्याला एक गाठोडे रेल्वे रुळाजवळ आढळून आले. रेल्वे सुरक्षा बल व दत्तापूर पोलिसांनी घटनास्थळ गाठले असता गाठोड्यात मृतदह आढळून आला. खिशातील कृषी केंद्राच्या चिठ्ठीवरून मृतदेहाची ओळख पटली. या तपासात खून झाल्याचे निष्पन झाले. दत्तापूर व रेल्वे पोलीस आणि बाभूळगावचे पोलीस निरीक्षक एल.डी. तावरे यांच्या संयुक्त कार्यवाहीमधून आरोपींना अटक केली. या घटनेने दाभा गावात खळबळ उडाली आहे.