जागतिक बँकेच्या अभ्यासातील वास्तव

ज्योती तिरपुडे-खोब्रागडे

नागपूर : कामाच्या ठिकाणी चांगले पाळणाघर नसणे किंवा ते न परवडणे या कारणास्तव महिला नोकऱ्या सोडत असल्याचे चित्र आहे. नागपुरातही अंगणवाडी सेविका सोडल्या तर सरकारी, खासगी आणि असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या महिला लहान मुलांचा सांभाळ करणारी यंत्रणा नसल्याने नोकरी सोडत आहेत.

कुठल्याही कुटुंबात मूल जन्माला येणे ही आनंदाची वार्ता असली तरी भारतातील २५ टक्के महिलांना पहिल्या मुलाच्या जन्माच्यावेळी नोकऱ्या सोडाव्या लागतात, असे जागतिक बँकेची आकडेवारी सांगते. महिलांना कामाच्या ठिकाणी पाळणाघराची सोय उपलब्ध नसणे, हे त्यामागील मुख्य कारण देण्यात आले आहे. पुरेशा किंवा परवडण्यायोग्य पाळणाघरांच्या अभावामुळे मध्यमवर्गीय असोत की असंघटित क्षेत्रातील महिला असोत त्यांना अर्थार्जनाचे साधन सोडून मुलांच्या संगोपनासाठी नाईलाजाने घरी बसावे लागते. महिला व बाल विकास मंत्री मेनका गांधी यांनी २०१६ मध्ये लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरादाखल राष्ट्रीय पाळणाघर कार्यक्रम आणि ‘डे केअर’ सुविधा देशभरातील असंघटित, खासगी आणि सरकारी क्षेत्रातही लागू असल्याची माहिती दिली होती. त्यासंबंधीचे धोरण लवकरच ठरणार असल्याचे जाहीरही केले. परंतु पाळणाघरासंबंधीचे राष्ट्रीय धोरण अद्याप ठरलेले नाही.  परिणामी, भारतात उपनगरांमध्ये २५ ते ३० टक्के महिला त्यांच्या पहिल्या बाळाच्यावेळी नोकऱ्या सोडून देतात. उपराजधानी त्याला अपवाद नाही. २०१३मधील जागतिक बँकेच्या अभ्यासानुसार, महिलांच्या लोकसंख्येच्या २७ टक्के महिला काम करायला जातात. यातील काही महिला दोन कारणास्तव  नोकऱ्या सोडतात. पहिले कारण, पाळणाघरात गुणवत्तेचा अभाव आणि परवडू शकतील अशी पाळणाघरे नसणे, दुसरे कामाच्या ठिकाणी ‘नॉन फ्लेक्झिबल वर्क कल्चर’ असणे. घरकाम करणाऱ्या असंघटित क्षेत्रातील महिलांची मिळकतच थोडी असल्याने त्या मुलांना पाळणाघरातही ठेवू शकत नाहीत. त्यामुळे हाती असलेली दोन तीन कामे काही काळासाठी सोडण्याशिवाय त्यांना पर्याय नसतो, असे विदर्भ मोलकरीण संघटनेच्या अध्यक्ष डॉ. रूपा कुळकर्णी यांनी सांगितले.

अन्नू डोग्रा यांची याचिका लक्षवेधी

केवळ सरकारी, खासगी किंवा असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनाच समस्या असतात असे नाही तर लष्करामध्ये काम करणाऱ्या महिलांनाही सुयोग्य पाळणाघराचा अभाव जाणवतो. गेल्या महिन्यात लेफ्टनंट कर्नल अन्नू डोग्रा यांनी पाळणाघर न पुरवल्याने कामठीच्या भारतीय लष्कराविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. जोधपूर येथून त्यांची नागपूर, कामठी याठिकाणी बदली करण्यात आली होती.  त्यांच्या दोन वर्षांच्या मुलीसाठी येथे पाळणाघराची सोय नसल्याने बालकांच्या हक्कापासून वंचित राहत असल्याचे डोग्रा यांनी याचिकेत म्हटले होते.

महिलांना बाळाच्या जन्माच्यावेळी नोकरी, रोजगार सोडावा लागतो, हा सार्वत्रिक अनुभव आहे. केवळ दूध पिणाऱ्या बाळांनाच आईची गरज असते असे नाही तर बालहक्कांमध्ये वाढत्या वयाच्या बालकांनाही आईची सोबत हवी असते. त्यातल्या त्यात अंगणवाडी सेविकांना त्यांच्या अंगणवाडीत लहान मुलांना घेऊन जाता येते. मासिक सभेतही त्या मुलांना घेऊन जातात. मात्र, उद्बत्ती, भांडी, पॅकेजिंग, हॉटेलमध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी नागपुरात पाळणाघरांची सोय नाही.

– श्याम काळे, सरचिटणीस, इंटक

Story img Loader