लोकसत्ता टीम
वर्धा : भारतीय लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणून लोकसभा निवडणुकीकडे पाहल्या जाते. या १५ दिवसात हा उत्सव साजरा करण्यात राजकीय पक्ष कसलीच कसर ठेवत नाही.
मात्र या उत्सवावर पूर्ण नियंत्रण ठेवण्याचे काम निवडणूक आयोग करीत असतो. अमर्याद अधिकार राखून असलेल्या आयोगाचे अधिकारी प्रत्येक बाबीवर निगराणी ठेवतानाच अभिनव उपक्रम पण राबवून लक्ष वेधून घेतात. नागपूर विभागात उत्कृष्ट निवडणूक अधिकारी म्हणून निवड झालेले वर्ध्याचे जिल्हाधिकारी तसेच यावर्षीच्या लोकसत्ताच्या ‘तेजांकित’ सन्मानाचे मानकरी राहुल कर्डीले यांनी निवडणूक अंमलबजावणीचा आराखडा तयार करतांना महिलांना अग्रभागी ठेवत एक उपक्रम आणला आहे. ज्या मतदान केंद्रात पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे त्या ठिकाणी केंद्राची पूर्ण जबाबदारी महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सोपविण्याचे ठरले आहे.
आणखी वाचा-लोकसभा निवडणूक : उमेदवारांचा समाज माध्यमावर आक्रमक प्रचार
अधिकाधिक महिलांनी मतदानचा हक्क पार पडावा म्हणून हा उपक्रम असल्याचे जिल्हाधिकारी सांगतात. मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व अन्य जबाबदारी निवडणूक सेवेतील महिलाच सांभाळणार. प्रायोगिक तत्ववर दहा मतदान केंद्राची निवड झाली आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा क्षेत्र मोडतात. त्या नुसार केंद्र निवडणूक झाली. धामणगाव मतदारसंघात चांदूर रेल्वे येथील जि. प. माध्यमिक शाळा, मोर्शी क्षेत्रात मोर्शी येथे शिवाजी माध्यमिक शाळा, आर्वीत कारंजा येथील कस्तुरबा विद्यालय व आर्वीत जि. प. प्राथमिक शाळा, देवळीत नगर परिषद कनिष्ठ महाविद्यालय, हिंगणघाट येथील साळवे प्राथमिक शाळा व सेंट जॉन हायस्कूल, वर्धा विधानसभा क्षेत्रात शासकीय विद्यालय व सावंगी येथील जि. प. प्राथमिक शाळा.