नागपूर : राज्यात महिलांवर बलात्कार, विनयभंग, अपहरण आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच आता राज्यातील महिला पोलीसही असुरक्षित असल्याचे चित्र आहे. राज्यातील आठ महिला पोलिसांवर त्यांच्या तीन वरिष्ठांनीच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उजेडात आली असताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या कार्यालयातही महिला पोलीस शिपायावर अत्याचार झाल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. या घटनेबाबत स्वत: वडेट्टीवार यांनी ट्विट करत सरकार आणि पोलीस प्रशासनाला धारेवर धरले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वडेट्टीवार ट्विटमध्ये म्हणतात की, पोलीस उपायुक्त, सशस्त्र पोलीस नायगाव, यांच्या कार्यालयात कार्यरत महिला पोलीस शिपायावर होत असलेल्या अत्याचाराबाबतची तक्रार माझ्या कार्यालयाला प्राप्त झाली आहे. अश्लील शेरेबाजी, कार्यालयात काम करत असतानाचा व्हिडीओ बनवणे, अश्लील हावभाव करून अत्याचार झाल्याची तक्रार सदर महिलेने केली आहे. वरिष्ठांकडे याबाबत तक्रार केल्यावर त्यावर कारवाई करण्याऐवजी सदर महिलेला मानसिक त्रास देण्यात आल्याची माहितीसुद्धा तक्रारीतून देण्यात आली.

हेही वाचा – वर्धा : व्याजाच्या पैशांमधून केला जाहिरातीचा खर्च, म्हणून संस्थेचा…

हेही वाचा – देशाच्या विविध भागांत आज मुसळधार पावसाचा अंदाज

वडेट्टीवार पुढे म्हणाले की, राज्याच्या पोलीस दलात मोठ्या प्रमाणात महिला कर्मचारी कार्यरत आहेत. राज्यातील महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी ज्या खात्याकडे आहे तेथीलच महिला कर्मचारी जर सुरक्षित नसेल तर राज्यातील इतर महिलांच्या सुरक्षेची काय स्थिती असेल, याचा अंदाज न लावलेला बरा. पोलीस दलात कर्तव्यावर असताना होत असलेल्या अत्याचारामुळे महिला कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य खचत असून नैराश्याची भावना त्यांच्या मनात घर करत आहे. पोलीस दल, सत्ताधाऱ्यांकडून न्याय मिळत नसल्यामुळे महिला पोलीस कर्मचारी विरोधी पक्षनेत्यांना पत्र लिहून न्याय मागत असेल तर सध्याच्या सरकारमध्ये पोलीस विभाग आतून किती पोखरला गेला आहे, हे स्पष्ट होते. गृहखात्याने पोलीस दलात महिलांवर होत असलेल्या लैंगिक अत्याचाराची, छळाची आता तरी गांभीर्याने दखल घ्यावी आणि आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही वडेट्टीवार यांनी केली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women police are unsafe complain directly to the office of the leader of the opposition what did vijay wadettiwar say rbt 74 ssb
Show comments