चंद्रपूर : मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी फसवणूक केल्याचा आरोप करीत अन्यायग्रस्त महिलांनी मनसे नेते राज ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेलबाहेर निदर्शने केली. कलकाम नावाच्या खासगी कंपनीत पैसे गुंतवणाऱ्यांची १०० कोटी रुपयांनी फसवणूक झाली आहे. या फसवणूक प्रकरणी कंपनी संचालक तथा स्थानिक अधिकारी, अशा सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यातील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली.
सध्या हा आरोपी जामिनावर सुटला आहे. या कंपनीचे संचालक व अधिकारी आरोपी असतानाही मनसेचे स्थानिक पदाधिकारी त्यांना मदत करीत आहेत. अशा पदाधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी आणि आम्हाला न्याय द्यावा, या मागणीसाठी या महिला येथे आल्या. यावेळी महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी राज ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत होते. यामुळे एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी महिलांना भेटण्यासाठी वेळ दिली होती, असे महिलांकडून सांगण्यात आले.