लोकसत्ता टीम
नागपूर: सत्ताधारी पक्ष एकीकडे लाडली बहिण योजनेतून महिलांना महिन्याला १,५०० रुपये देऊन त्यांची मते आकर्षीत करण्याचे प्रयत्न करत आहे. दुसरीकडे नागपुरातील अनेक गरीब महिलांना धान्यासाठी भर पावसात रेशन दुकानात रांगेत तास न तास उभे राहावे लागते. सर्व्हर डाऊन असल्यामुळे वारंवार चकरा मारूनही जुलै महिन्याचे धान्य मिळत नाही. त्यामुळे लाडक्या बहिणी सरकारवर संताप व्यक्त करत आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातही मोठ्या संख्येने गरीब कुटुंब राहतात. या शिधापत्रक असलेल्या कुटुंबाला शासनाच्या नियमानुसार धान्य उपलब्ध केले जाते. परंतु धान्यासाठी शासनाकडून या कुटुंबाला रेशन दुकाातील एका यंत्रावर अंगठा लावून बायोमेट्रिक सदृष्य प्रक्रिया करावी लागते. येथील यंत्राचे सर्व्हर गेल्या दहा दिवसांपासून डाऊन आहे. त्यामुळे नागपुरातील अनेक कुटुंबांना जुलै महिन्याचे धान्य मिळाले नाही.
आणखी वाचा-घरा-घरांत डासांची उत्पत्ती; सतर्क रहा, अन्यथा…
नागपुरात रेशनचे धान्य घेण्याऱ्यांमध्ये महिलांचीही संख्या मोठी आहे. सत्ताधारी पक्षाने या गरीब बहिनींना आकर्षीत करण्यासाठी अर्थसंकल्पात लाडली बहिन योजना जाहिर केली आहे. त्यामुळे योजनेत अर्ज करण्यासाठी महिला गर्दी करत आहे. यातील लाभार्थांना १,५०० रुपये महिन्याला मिळेल. या योजनेतून सत्ताधाऱ्यांना महिलांचे मत येत्या विधानसभा निवडणूकीत आकर्षीत करायचे आहे. परंतु नागपुरात सर्व्हर डाऊनमुळे या लाडली बहिनींवर एन् पावसात वारंवार ध्वान्याविना दुकानातून परतण्याची पाळी येत आहे. त्यामुळे या बहिनींच्या मनात शासनाच्या या प्रणालीविरोधात प्रचंड संताप आहे. बुधवारीही नागपुरातील झिंगाबाई टाकळी, सदरसह इतरही अनेक भागात नागरिकांनी धान्यासाठी रेशन दुकानात भर पावसात रांगा लावल्या होत्या. परंतु सर्व्हर डाऊन असल्याने ९० टक्के लोकांना धान्य न घेता परतावे लागले. या पद्धतीने सर्व्हर डाऊन राहिल्यास गरीबांनी धान्यविना उपाशी मरायचे काय? हा प्रश्न शिधापत्रिकाधारक विचारत आहे.
आणखी वाचा-सुवर्णवार्ता ! सोन्याचे दर निच्चांकीवर.. सराफा व्यवसायिक म्हणतात…
नागपुर जिल्ह्यातील शिधापत्रीकांची स्थिती
नागपूर शहरात ६८२ शिधा दुकानांमध्ये ४ लाख २० हजार ६७ शिधापत्रीकांची नोंद आहे. त्यात अंत्योदयचे ४५ हजार ८२४ तर प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकांची संघ्या ३ लाख ७४ हजार २४३ आहे. नागपूर ग्रामीणला १ हजार ३०२ शिधा दुकानांमध्ये ४ लाख ४९ हजार १७० शिधापत्रिकांची नोंद आहे. त्यात ८० हजार ५१८ अंत्योदय आणि ३ लाख ६८ हजार ६५२ प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकांचा समावेश आहे.
“ दुकानदार रोज सकाळपासून नागरिकांना शिधा देण्याचे प्रयत्न करतात. परंतु सर्व्हर डाऊनमुळे ५ ते १० टक्केच लोकांना धान्य दिले जाते. रेशन दुकानदार सातत्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी समनव्य करून तोडगा काढण्याचे प्रयत्न करत आहे.” -रितेश अग्रवाल, सचिव, स्वस्त धान्य दुकानदार संघ, नागपूर.