राजेश्वर ठाकरे

नागपूर : कार्यस्थळी महिलांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक असताना रेल्वे इंजिनमध्ये स्वच्छतागृह नसल्याने महिला इंजिन चालकांची मोठी कुंचबणा होत आहे. रेल्वेने याविषयाची दखल घेऊन पावले टाकली आहेत. परंतु, अद्याप तरी देशात एकाही इंजिनमध्ये स्वच्छतागृह उपलब्ध होऊ शकलेले नाही.

महिला सक्षमीकरण करण्यासाठी आणि महिला-पुरुष असा भेद नष्ट करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात महिलांना बरोबरीने संधी उपलब्ध करून दिली जात आहे. त्यामुळेच एकेकाळी केवळ पुरुषांचे क्षेत्र समजल्या जाणाऱ्या इंजिन चालकाच्या क्षेत्रात महिला आता मोठय़ा प्रमाणात दिसू लागल्या आहेत. देशात सुमारे तीन हजार महिला रेल्वे इंजिन चालक म्हणून नियुक्त आहेत. रेल्वे इंजिन चालकाला नऊ तासांची डय़ुटी असते. मालगाडी असल्यास नऊ ते ११ तास कर्तव्यावर राहावे लागते. रेल्वे इंजिनमध्ये स्वच्छतागृह नसल्याने विशेषत: महिला इंजिन चालकांना मन:स्ताप होते. चालत्या गाडीत त्यांच्याकडे काहीच उपाय नसतो. प्रवासी गाडय़ांच्या महिला चालकांना नैसर्गिक विधीसाठी स्थानकावरील किंवा शेजारच्या डब्यातील स्वच्छतागृहाचा वापर करावा लागतो. याविरोधात महिला इंजिन चालकांनी आणि इंजिन चालक संघटनांनी आवाज उठवला. त्यानंतर रेल्वे सर्वेक्षण घेतले आणि इंजिन चालकांचे मत जाणून घेतले होते. विशेष म्हणजे, राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने रेल्वे इंजिनमध्ये स्वच्छतागृह आणि वातानुकूलित यंत्रणा बसवण्याचे आदेश २५ एप्रिल २०१६ रोजी दिले होते. रेल्वेबोर्डाने ते मान्यही केले होते. परंतु, अद्यापही सेवेतील इंजिनमध्ये स्वच्छतागृहांची व्यवस्था झालेली नाही, असे ऑल इंडिया लोको रिनग स्टॉफ असोसिएशनचे नागपूर विभागाचे अध्यक्ष एम.पी. देव यांनी सांगितले.

स्वच्छतागृहाअभावी अडचणी येतात म्हणून इंजिन चालक महिलांना रात्रीचे काम देणे टाळण्यात येते. तसेच मुख्य इंजिनच्या मदतीसाठी वापरल्या जाणाऱ्या इंजिनवर डय़ुटी दिली जाते. किंवा मग कार्यालयीन कामे दिली जातात. रेल्वेनेही पळवाट काढली आहे. परंतु, महिला इंजिन चालक स्वच्छतागृहापासून वंचितच आहेत, असे भारतीय यात्री केंद्राचे अध्यक्ष बसंतकुमार शुक्ला म्हणाले.

सध्यातरी देशात एकाही रेल्वे इंजिनमध्ये स्वच्छतागृहाची व्यवस्था नाही. स्वच्छतागृहाचे ‘डिझाईन’ अंतिम करण्यात येत आहे. नवीन इंजिनमध्ये तशी व्यवस्था केली जाणार आहे.

– रवीशकुमार सिंह, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे.

Story img Loader