नागपूर : शहरात घेण्यात आलेल्या ज्युनियर मिस इंडिया फॅशन शो कार्यक्रमाचा भारतीय स्त्री शक्तीसह अन्य महिला संघटनांनी निदर्शने करत विरोध केला. यावेळी आयोजक संस्थांना निवेदन देत यापुढे लहान मुलींच्या सौैदर्य स्पर्धा न घेण्याचा इशारा दिल्याचे भारतीय स्त्री शक्तीच्या हर्षदा पुरेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
हेही वाचा >>> नागपूर : ‘मी खूप दिवसांपासून आजारी आहे. त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे’
पुरेकर म्हणाल्या, ४ ते १४ या वयोगटातील मुलींसाठी ज्युनियर मिस इंडिया स्पर्धा नागपुरात आयोजित करण्यात आली होती. एवढ्या लहान वयात शारीरिक सौंदर्याविषयीचे विचार त्यांच्या मनात निर्माण करणे अयोग्य आहे. अशा पद्धतीच्या स्पर्धा किंवा इव्हेंटद्वारे लहान मुलींच्या भावनांशी खेळणे चुकीचे आहे. केवळ पैसा, प्रसिद्धी याला बळी पडून पालकांनी आपल्या मुलींना ताण देऊन त्यांचे बालपण आणि निरागसता हिरावून घेऊ नये. भारतीय स्त्री शक्तीसह राष्ट्र सेविका समिती, विश्व हिंदू परिषद, दुर्गा वाहिनी, वनवासी कल्याण आश्रम आदी संघटनांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन निषेध नोंदवला. यावेळी बालरोग तज्ज्ञ संघटनेने या फॅशन शो चा विरोध केला. पत्रकार परिषदेला निलम वर्वते, वासंती देशपांडे, मेघा कोर्डे, राधिका देशपांडे, मीरा कडबे उपस्थित होत्या.