चंद्रपूर:पळसगाव वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या कॅम्पिंग साईटवर (विश्रामगृह) निवड केलेल्या झाँशी राणी महिला बचतगटाच्या मासिक उत्पन्नातून एकूण 5 टक्के रक्कम विकासाच्या नावावर वन समितीच्या बँक खात्यात जमा  करण्याची अट लावल्याने आक्रमक झालेल्या बचतगट महिला व गावकऱ्यांनी  ताडोबा अभयारण्याचे चिमूर तालुक्यातील मदनापूरचे प्रवेशद्वार बंद पाडले आहे. मागील चार दिवसांपासून या प्रवेशद्वारातून एकही पर्यटक ताडोबात पर्यटनासाठी गेला नाही.  सदर अट जो पर्यंत रद्द होणार नाही तो पर्यंत प्रवेशद्वार सुरू करणार नाही अशी भूमिका मदनापूर येथील गावकऱ्यांनी घेतल्याने वनविभाग व गावकऱ्यांमधील वाद पेटण्याची शक्यता आहे.

ताडोबा अभयारण्य जगभरात व्याघ्र दर्शनासाठी प्रसिध्द आहे. ताडोबा अभयारण्याचे बफरझोनमध्ये सहा प्रवेशद्वार एकट्या चिमुर तालुक्यात आहे. त्या मध्ये निमढेला, अलीझंझा, कोलारा, मदनापूर, गोंडमोहाडी व पळसगाव आदींचा समावेश आहे. पळसगाव  वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या मदनापूर कॅम्पिंग साईटवर (विश्राम गृहावर)  मागील चार ते पाच वर्षांपासून  या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांकरीता स्वयंपाक बनविण्याचे कंत्राट ग्रामसभेमध्ये निवड करून बचतगटाला दिले जाते. यावेळी मार्च महिण्यात मदनापूर येथील झाँशी राणी बचतगटाची  ग्रामसभेमध्ये निवड करण्यात आल्याने त्यांना स्वयंपाक करण्याचा कंत्राट मिळाला आहे.

वन विभागाने या बचतगटाला नुकताच कार्यारंभ आदेश दिला. परंतु त्या आदेशात वन परिक्षेत्राधिकरी योगीता आत्राम यांनी, बचतगटाच्या मासिक उत्पन्नाच्या एकूण ५ टक्के रक्कम विकासासाठी वनसमितीला जमा करण्याची अट लावली.  बचतगट महिलांच्या हाती आदेश पडताच नव्याने लावण्यात आलेल्या या अटीचा कडाडून विरोध करण्यात आला.

विशेष म्हणजे यापूर्वी काम देण्यात आलेल्या एकही बचतगटाला  ही ५  टक्के रक्कमेची अट लावण्यात आली नव्हती. त्यामुळे सदर अट रद्द करण्याची मागणी पळसगावच्या क्षेत्राच्या वनपरिक्षेत्राधिकारी योगिता आत्राम यांचेकडे करण्यात आली, परंतु  सदर मागणीला  त्यांनी ठेंगा दाखवून ५  टक्के रक्कम भरावेच लागेल अशी ताठर भूमिका वन परिक्षेत्राधिकारी यांनी घेतली.

विशेष म्हणजे ताडोबाच्या मदनापूर पर्यटन प्रवेशद्वारावरून मोठ्या प्रमाणात पर्यटक पर्यटनाकरीता येतात. परंतु कॅम्पिंग साईटवर भोजनासाठी फारसे येत नाही. भोजनला पर्यटकांचा प्रतिसाद कमी असल्याने मिळणारे उत्पन्न् फारस कमी आहे. अशा स्थितीत ५ टक्के रक्कम समितीमध्ये जमा करणे झाँशी राणी बचतगटातला परवडणारे नव्हते. त्यामुळे सदर अट रद्द करण्याची मागणी त्यांनी लावून धरली आणि भोजनाकरीता लाणारे साहित्याचीही खरेदी केली.

मदनापूर येथील वन समितीने ५ टक्के रक्कम समितीला देण्याविषयी लावलेली अट रद्द करण्याची मागणी केली. परंतु याकडे दुर्लक्ष झाल्याने अखेर ८ एप्रिलला सकाळी बचतगट  महिला व गावकऱ्यांनी मदनापूर प्रवेशद्वार काठ्या,दगड प्रवेशद्वाराजवळ मांडून बंद पाडले. त्यामुळे त्या दिवशी ऑनलाईन बुकींग केलेल्या पर्यटकांना कोलारा प्रवेशद्वारातून पर्यटनासाठी सोडण्यात आले. मागील चार दिवसांपासून आजमितीस मदनापूर पर्यटन प्रवेशद्वार  बंद आहे. मदानापूर गावात १६ जिप्सी आहेत तर तेवढेच गाईड आहेत.

सध्या या प्रवेशद्वारावरून पर्यटन बंद असल्याने त्यांना घरीच राहावे लागत आहे. बचतगटावरही 5 टक्याची अट लादल्याने त्यांचाही रोजगार बुडत आहे. गावात पोलिस प्रशासनाने गावात जावून प्रवेशद्वार सुरू करण्यासाठी प्रयत्न केला परंतु त्यांनाही यावर तोडगा काढता आलेला नाही. परंतु वनविभागाचे सांगण्यावरून पोलिसांनी गावात येऊन बचतगटावर दबाव टाकत असल्याचा आरोप महिलांनी केला आहे.

सदर प्रकाराबाबत बफर झोनचे उपसंचालक कुशाग्र पाठक यांना माहिती देण्यात आली आहे, परंतु यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. एकीकडे वनपरिक्षेत्राधिकारी आत्राम ह्या आपल्या भूमिकेवर ठाम  आहेत तर गावकरी व बचतगट महिला 5 टक्याची अट रद्द करण्याच्या मागणीवर ठाम असल्याने चार दिवसानंतरही मदनापूर प्रवेशद्वार बंदच आहे. मात्र यावर वरिष्ठांनी हस्तक्षेप केला नाही तर गावकरी व वनविभाग यांच्यामध्ये वाद पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही.