चंद्रपूर : स्त्री-पुरुष समानतेचा कितीही गाजावाजा करण्यात येत असला तरी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया महिलांनाच करावी लागते. नसबंदीची शस्त्रक्रिया ‘नको रे बाबा’ म्हणत पुरुषांकडून महिलांनाच पुढे केले जात आहे. जिल्ह्यात पुरुष नसबंदीच्या शस्त्रक्रियेचा टक्का कमीच आहे. मागील काही वर्षांत मोजक्याच पुरुषांनी नसबंदी शस्त्रक्रिया केली आहे. कुटुंब नियोजनात महिलाच आघाडीवर आहेत. एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यांत सहा हजार ९२० कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया झाल्या. त्यात ६ हजार १४२ महिला, तर ७७८ पुरुषांचा समावेश आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महिलांच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेपेक्षा पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया अत्यंत सोपी असते. महिलांना टाक्यांची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करायची असेल तर किमान तीन दिवस रुग्णालयात राहावे लागते. मात्र, पुरुषांची नसबंदी शस्त्रक्रिया काही तासांत उरकते. तरीही पुरुषांची या शस्त्रक्रियेला नकारात्मक भूमिका असते. पुरुष नसबंदीबाबत समाजात अनेक गैरसमज पसरले आहेत. कुटुंब नियोजनाची जबाबदारी महिलांची आहे, असा समज आजही पुरुष मानसिकतेत रुजू झाल्याचे चित्र आहे.

हेही वाचा – गडकरींना धमकी देणाऱ्या कैद्याला मोबाईल-इंटरनेट सुविधा, नक्की कसा शोधला गडकरींच्या कार्यालयाचा दूरध्वनी?

वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी कुटुंब कल्याण कार्यक्रम सरकारने सुरू केला आहे. यासाठी राज्य लोकसंख्या धोरण जाहीर करण्यात आले आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या माध्यमातून कुटुंब कल्याण कार्यक्रम राबवला जातो. मागील वर्षी एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाअंतर्गत येणारे प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, शहरी भागातील जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयात कुटुंब कल्याण कार्यक्रमाअंतर्गत स्त्री, पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया कार्यक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्याला ११ हजार ९९८ शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट देण्यात आले.

उद्दिष्टानुसार जिल्ह्यात सहा महिन्यांत शस्त्रक्रिया झाल्या. त्यात ६१४२ महिला, तर ७७८ पुरुषांनी नसबंदी शस्त्रक्रिया केल्या. याची टक्केवारी ५८ इतकी आहे. दोन अपत्यावरही कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यातही महिलाच आघाडीवर आहेत. पाच हजार ३३८ महिला, तर ४९३ पुरुषांनी शस्त्रकिया केल्या. शासकीय आरोग्य संस्थेत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यानंतर नसबंदी केलेल्या पुरुष लाभार्थ्याला केंद्र शासनाच्या माध्यमातून एक हजार शंभर रुपयांचे प्रोत्साहन अनुदान दिले जाते. याशिवाय राज्य शासनाकडून अनुदान प्राप्त झाल्यानंतर ३५१ रुपयांचे अनुदान दिले जाते. स्त्री नसबंदीत अनु. जाती, अनु. जमाती आणि दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांना केंद्र शासनाचे सहाशे रुपये, तर दारिद्र्यरेषेवरील लाभार्थ्यांना अडीचशे रुपये अनुदान दिले जाते.

हेही वाचा – विधान परिषद निवडणुकीत मविआची जागांची अदलाबदल, नागपुरात काँग्रेसचा पाठिंबा कोणाला?

—-चौकट—-

राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्याला अकरा हजार ९९८ शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी सहा हजार ९२० शस्त्रक्रिया करण्यात आल्या. याची टक्केवारी ५८ टक्के आहे. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यात आरोग्य विभागातर्फे जनजागृती करण्यात येत आहे, असे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गहलोत यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women vasectomy surgery participation more than male in chandrapur rsj 74 ssb