गडचिरोली : जिल्ह्यातील चामोर्शी येथील भाजपचे नगरसेवक आशीष पिपरे यांच्या विरोधात महिलांनी फसवणूकीची तक्रार केली आहे. आशीष पिपरे यांनी अगरबत्ती उद्योगासाठी ४० हून अधिक महिलांच्या नावावर कर्ज उचलून फसवणूक केल्याचा गंभीरा आरोप आज गुरुवार, ३१ मार्च रोजी येथे पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, भाजप नगरसेवक आशीष पिपरे यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

पत्रपरिषदेला कविता किरमे, दिलीप किरमे, वंदना कोठारे, शालिनी पिपरे आदींची उपस्थिती होती. यावेळी अगरबत्ती व्यवसायाच्या नावाखाली गैरव्यवहार केल्याच्या आरोपासह ट्रॅक्टर खरेदी- विक्री व्यवहार तसेच चिचडोह बॅरेजमध्ये अधिग्रहित केलेल्या जमिनीचा अधिकचा मोबदला मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक केल्याचा दावा महिलांनी केला. यासंदर्भात चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अन्यथा आत्मदहन करण्याचा इशाराही महिलांनी दिला. यासंदर्भातील सर्व पुराव्यानिशी पोलीस ठाणे व न्यायालयात तक्रार केली, पण दखल घेतली नाही. मात्र न्याय मिळत नाही तोपर्यंत लढत राहू, असे महिलांनी सांगितले.

नगरसेवकाने आरोप फेटाळले

हे सर्व आरोप निराधार असून राजकीय हेतूने प्रेरित आहेत. माझी प्रस्थापितांविरोधात राजकीय लढाई सुरू आहे. त्यामुळे माझी प्रतिमा डागाळण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. राजकीय वैमनस्यातून बिनबुडाचे आरोप करण्याऐवजी संबंधितांनी माझ्याविरुद्ध पोलीस ठाणे, न्यायालयात जावे. माझी बदनामी करणाऱ्यांविरुद्ध मी कायदेशीर कारवाई करणार आहे, असे नगरसेवक आशीष पिपरे यांनी म्हटले आहे.

नेत्यांच्या नावाने धमकावल्याचा दावा

कर्जवसुलीसाठी बँकेची नोटीस प्राप्त झाल्यानंतर आश्चर्याचा धक्का बसला. याविरुद्ध आम्ही चार वर्षांपासून पोलीस ठाणे, प्रशासन व लोकप्रतिनिधींकडे तक्रारी करून थकलो, पण कोठेही न्याय मिळाला नाही. नगरसेवक आशीष पिपरे यांनी नेत्यांच्या नावे आम्हाला धमकावले असा आरोप तक्रारदार महिलांनी केला. त्यांनी माजी खासदारांचे नावही घेतले.