कमावत्या महिलांचे प्रमाण २० टक्क्य़ांनी वाढले

शहरी भागात नोकरी करणाऱ्या महिलांचे प्रमाण २० टक्क्य़ांनी वाढले असून करिअर आणि घराला आर्थिक हातभार हे दोन्ही उद्देश साध्य करण्यासाठी या महिलांकडून खासगी पाळणाघरांच्या पर्यायाला अधिक प्रमाणात पसंती दिली जात आहे.

शिक्षणातील महिलांचा टक्काही दिवसेंदिवस वाढत असून शिक्षण घेतल्यानंतर करिअरच्या संधी आणि त्यातून मिळणारी आर्थिक सक्षमता कुटुंबाला फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे कुटुंबातील सदस्यही महिलांच्या करिअर आणि नोकरी करण्यावर शहरात आक्षेप घेत नाहीत. मात्र, एकच पालक असलेल्या कुटुंबात कमावत्या महिलेला मुलांच्या संगोपनासाठी वेगळी तडजोड करावी लागते.

काही पाळणाघरात शून्य ते सहा तर काही पाळणाघरात १२ वर्षांपर्यंत मुले ठेवण्याची मुभा आहे. ज्या ठिकाणी पालक काम करतात त्याच कंपनीच्या व्यवस्थापनाकडून वेगवेगळ्या शहरात शाखा असलेले पाळणाघर, एखाद्या व्यक्तीकडून चालविले जाणारे पाळणाघर, शाळांना जोडलेली पाळणाघरे आणि घरामध्येच आर्थिक गरज भागवण्यासाठी चालवली जाणारी खासगी अशी विविध पाळणाघरे चालविली जातात. मुलांचे शिक्षण, घरभाडे, घरखर्च आणि इतर दैनंदिन खर्चासाठी पती-पत्नी दोघांनीही नोकरी करणे आता गरज झाली आहे. अशा पालकांचा अधिक कल खासगी पाळणाघरांकडे आहे.

महिला आणि बालविकास विषयाच्या अभ्यासक प्राध्यापक डॉ. पाठराबे म्हणाल्या, हल्ली महिलांचा खासगी पाळणाघरात मुलांना ठेवण्याकडे कल आहेच. शिवाय काही वेळेस पर्यायच नसतो. मात्र, खासगीरित्या बाळाचा सांभाळ करणारीही काही कुटुंबे आहेत. ‘पेईंग गेस्ट’ ठेवावेत त्याप्रमाणे दोन किंवा तीन मुलांनाच ठेवून घेतले जाते. मुलाची व्यक्तिश: काळजी घेतली जाईल म्हणून चांगले अर्थार्जन करणारे पालक अशाच कुटुंबात मुलांना  ठेवण्याचा प्रयत्न करतात.

समितीचे काम थंड

पाळणाघरासंबंधीचे देयक  तयार करण्यासाठी  राज्याचे मुख्य सचिव प्रमुख असलेल्या १५ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली होती. ही समिती समाज कल्याण मंडळ, स्थानिक प्रशासन, एनजीओ आणि खासगीरित्या पाळणाघर चालवणाऱ्यांविषयी दिशानिर्देश तयार करणार होते. मात्र, सध्या समितीचे काम थंड आहे.

लैंगिक अत्याचाराच्या एका प्रकरणानंतर महिला आणि बाल विकास विभागांतर्गत पाळणाघरासंबंधीचे धोरण विचाराधीन आहे.  बालकांच्या सुरक्षितेसाठी आणि पालकांच्या समाधानासाठी अशाप्रकारच्या धोरणंची गरज आहे.

– सुजाता देशमुख, जिल्हा परिविक्षा अधिकारी

मुले झाली की काहीतरी फार विशेष झाले असे सर्व नातेवाईक आणि पती भासवत असतात. थोडीशी कळ काढली असती आणि नवऱ्याच्या भावनिक कचाटय़ात अडकले नसते तर आज सेवानिवृत्त होऊन निवृत्तीवेतन घेतले असते. तेव्हा भावनेच्या भरात जाऊन नोकरी सोडली. मुलांना पाळणाघरात ठेवून काम करायला हवे होते, पण पाळणाघराचा उगाचच बाऊ केल्याचा आता पश्चात्ताप होत आहे.

– विजया गजभिये

Story img Loader