नागपूर : उतारवयात दुचाकी चालवणे खूप अडचणीचे असते. मात्र, नाईलाजास्तव दुचाकी चालवून कामे करावी लागतात. मात्र, आता वाहतूक पोलिसांनी मनमर्जी करीत दुचाकीवर मागे बसणाऱ्यांनाही हेल्मेट सक्ती केली आहे. त्यामुळे आता जेष्ठ नागरिकांनी या वयात स्वतःचा जीव सांभाळावा कि हेल्मेट, असा प्रश्न निर्माण झाला आहे. वाहतूक पोलिसांच्या सहप्रवाशाला हेल्मेट सक्तीला यापूर्वी महिला वर्गांनी विरोध केला होता. तर आता जेष्ठ नागरिकांनासुद्धा विरोध दर्शवला आहे.
वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अर्चित चांडक यांनी शहरातील रस्ते आणि वाहतूक व्यवस्थेचा अभ्यास करुन निर्णय घेणे अपेक्षित होते. मात्र, दुचाकीवरील सहप्रवाशाला हेल्मेट सक्तीचे अचानक आदेश काढण्यात आले. त्यामुळे अनेकांची अडचण झाली आहे. अनेक वृद्ध दाम्पत्य दुचाकीने बाजारात, धार्मिक कार्यक्रमात, भाजीपाला आणायला किंवा अन्य कामे करण्यासाठी बाहेर पडतात. वयोमानामुळे ते दुचाकीसुद्धा हळूहळू चालवतात. आता त्यातही अशा वृद्ध दाम्पत्यांना दोघांनाही हेल्मेट सक्ती करण्यात आली. हा निर्णय वृद्ध नागरिकांसाठी मोठा अडचणीचा ठरणार आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी कायद्यावर बोट ठेवण्यापेक्षा वृद्धांच्या जीवाचा आणि वयोमानाचाही विचार करायला हवा. अन्यथा जेष्ठ नागरिकांना ऑटोचालक भाड्याचे अव्वाच्या सव्वा पैसे सांगून लुबाडतील.
हेही वाचा…महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी मुंबईला जायचंय्? मग ‘हे’ वाचाच…
जेष्ठांच्या प्रतिक्रिया
बबनराव गांजरे
हेल्मेट सक्ती ही जेष्ठ नागरिकांना त्रासदायक ठरेल. जेष्ठांचे वय लक्षात घेता शरीर सांभाळावे कि हेल्मेट सांभाळावे हा प्रश्न आहे. हेल्मेट घातल्यास मानेचा त्राससुद्धा वृद्धांना होऊ शकते. हेल्मेट सांभाळण्याचाही प्रश्न उद्भवतो. त्यामुळे हेल्मेट सक्तीतून जेष्ठ नागरिकांना सवलत द्यायला हवी. डॉ. बबनराव गांजरे (जेष्ठ नागरिक सेवा मंडळ)
विनोद मेश्राम
वाहतूक पोलीस सहप्रवाशाला हेल्मेट सक्ती करुन जेष्ठ नागरिकांना सवलती देण्यापेक्षा त्रास देण्याचा प्रयत्न करीत आहेत. बाजारात किंवा खरेदीला गेल्यानंतर आता जोडीदाराला पिशवी घेण्यास मदत करावी कि दोन-दोन हेल्मेट सांभाळावे, या प्रश्न पडणार आहे. वाहतूक पोलिसांनी मनमानी थांबवावी. दुचाकीचालकाडून दंड वसुलीचे टार्गेट ठेवून निर्णय घेऊ नये.
विनोद मेश्राम (सेवानिवृत्त अधिकारी)
पुंडलिक धकाते
उतारवयात अनेक जण आजारांनी जखडलेले असतात. पाठदुखी, कंबरदुखी, मानदुखीचा त्रास वृद्धांना जाणवतो. त्यातही आता वाहतूक पोलिसांनी मनमानी करीत जोडीदाराला हेल्मेट सक्ती केली. शरीराने थकलेल्या जेष्ठांना हा त्रास देण्याचा प्रयत्न आहे. पुंडलिक धकाते (सेवानिवृत्त कर्मचारी)
सुनीता चापके
वाहतूक पोलीस केवळ दंड वसुलीसाठी जोडीदारावर हेल्मेट सक्तीच्या शस्त्राचा वापर करीत आहेत. शहरातील रस्त्यावर वाहतुकीची कोंडी नेहमीच असते. रस्त्यावर खड्डे आहेत. सिग्नल नेहमी बंद असतात. शहरात पार्किंगची व्यवस्था नाही, हे सर्व सोडून पोलीस हेल्मेट सक्तीवर भर देत आहेत, याचे आश्चर्य वाटत आहे. सुनीता चापके (शिक्षिका)
विनोद साहुरकर
जेष्ठ नागरिकांसाठी वाहतूक पोलिसांनी आतापर्यंत कोणत्याही सोयी-सुविधा केल्या नाहीत. परंतु, हेल्मेट सक्तीसाठी लगेच पोलीस सज्ज झाले आहेत. पूर्वी चालकालाच हेल्मेट सक्ती होती, आता जोडीदारालाही सक्ती करण्यात आली आहे. काही दिवसांतच हेल्मेट सक्तीच्या नावावर पोलीस वसुली सुरु करतील. विनोद साहुरकर (व्यावसायिक)