लोकसत्ता टीम

नागपूर : मराठमोळी नऊवारी परिधान करत अतिशय भरभक्कम बुलेट वाहनांवर थक्क करणारे प्रात्यक्षिके सादर करत नागपूरमधील स्त्रीयांनी लोकांना आश्चर्यचकित आणि स्त्री शक्तीला वंदन करायला भाग पाडले. निर्मल परिवार आणि ह्मुमॅनिटी सोशल फाऊंडेशनच्यावतीने अजनी येथील पोलीस मैदानातून महिलांची ही बुलेट रॅली काढण्यात आली.

यात सहभागी महिलांनी थरारक प्रात्यक्षिके सादर केली. या प्रात्यक्षिकांचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर वेगाने व्हायरल होत आहेत. अजनी लोहमार्ग पोलीस अधीक्षक कार्यालयाचे मैदान येथून रॅलीला सुरुवात झाली. मेडिकल चौक, क्रीडा चौक, रेशीमबाग, गजानन चौक, तिरंगा चौक, मंगलमूर्ती चौक, भांडे प्लॉट चौक, छोटा ताजबाग चौक, अयोध्यानगर, मानेवाडा रोड, तुकडोजी पुतळा येथून परत अजनी लोहमार्ग पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मैदानावर रॅलीचा समारोप झाला.

बुलेटची गडगडाट अन् स्त्रीशक्तीची धुमाकुळ

विस्तीर्ण पटांगणावर मराठमोळ्या नऊवारी साडीत सजलेल्या रणरागिणींचा डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा रंगला होता. सडपातळ कणखर बांधा, कपाळावर ठसठशीत कुंकू, कपाळावर टिळा, गळ्यात मण्यांचा हार आणि आत्मविश्वासाने तेजाळलेला चेहराच्या साऱ्या देखण्या स्त्रिया बुलेटवर स्वार झाल्या होत्या. बुलेटच्या गडगडाटासोबत त्यांच्या अद्वितीय कौशल्याने अवघे मैदान थरारले होते.

केसांत माळलेली गजरे वाऱ्याच्या झुळकीसोबत नाचत होते, आणि त्यांचे चपळ हात स्टिअरिंग सांभाळत वेगवान प्रात्यक्षिके सादर करत होते. कुणी दोन बुलेटमध्ये उभे राहून समतोल साधत होते, तर कुणी हात सोडून बुलेट उडवीत नजरेत भरणारा चमत्कार घडवत होते. गरुडासारखा भेदक दृष्टीने मार्ग मोकळा करत या साहसी वीरांगना नव्या युगातील दुर्गा भासत होत्या.

त्यांच्या प्रत्येक हालचालीत आत्मसन्मान, धैर्य आणि स्वातंत्र्याची ओढ होती. प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट आसमंत दणाणत होता. हा सोहळा केवळ कौशल्याचा नव्हे, तर स्त्रीशक्तीच्या अद्भुत बाण्याचा अभिमानास्पद साक्षात्कार होता!

‘बुलेट’वर विविध किल्ल्यांच्या प्रतिकृती

मिरवणुकीला प्रचंड गर्दी झाली होती. शहरातील विविध भागातून ही रॅली पाहण्यासाठी नागरिक आले होते. यावेळी उपक्रमात सहभागी महिला बुलेटस्वारांनी स्त्रीशक्तीचा संदेश देणारे नृत्य सादर केले. उपस्थितांनी त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. समारोपीय कार्यक्रमात विविध पुरस्कारांनी सन्मानित मिरवणुकीत सहभागी महिलांनी बुलेट्सची विशेष सजावट केली होती.

एका महिलेने तिच्या बुलेटवर शिवमूर्ती बसवली. काही बुलेट वाहनावर विविध किल्ल्यांची प्रतिकृती बसवण्यात आली होती. काही महिलांनी आपल्या बुलेट वाहनाला रंगीबेरंगी फुलांनी सजवले होते. काही महिलांच्या बुलेटवर मॉ जिजाऊ, शिवाजी महाराज यांच्या चित्रासह भगवा झेंडा फडकत होता. मिरवणुकीच्या मार्गात नागपूरकरांनी महिलांच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.