जगातील सर्वाधिक क्षयरोग्रस्त भारतात असून सुमारे ३० टक्के लोकसंख्या या आजाराने प्रभावित झाली आहे. मात्र, आपल्यासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे, या ३० टक्क्यांपैकी ९० टक्के लोकांमध्ये हा आजार त्रासदायक नसतो. फक्त १० टक्के लोकच याचे लक्ष्य बनतात. ‘बीसीजी’ लस देण्यात येत असली तरी ती अधिक प्रभावी नसून नव्या प्रकारच्या ‘बीसीजी’ लसींवर काम सुरू असल्याची माहिती वैज्ञानिक व औद्यागिक संशोधन परिषदेचे माजी महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
हेही वाचा- ‘भारत भविष्यात विज्ञानाची महासत्ता बनेल’; नोबेल विजेत्या प्रा. ॲडा योनाथ यांचा विश्वास
१०८ व्या इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये आयोजित एका सत्रात सहभागी झाले असता त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. शेखर मांडे म्हणाले, २०२५ पर्यंत देश क्षयरोगमुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी तीन गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. त्यात प्रामुख्याने निदान, त्यानंतर प्रतिबंधक लस वा नव्या औषधांचा शोध आणि ते उपचारासाठी प्रक्रिया राबवणे. सध्या डॉ. थेरपी प्रचलित आहे. ती प्रभावी असल्याचे दिसून येते. यावेळी त्यांनी केलेल्या जनुकीय क्रमनिर्धारण चाचणीबाबत माहिती दिली. सहा महिन्यात देशातील १ हजारांवर लोकांची जनुकीय क्रमनिर्धारण चाचणी करण्यात आली. आपल्या वैज्ञानिकांमध्येही जनुकीय क्रमनिर्धारण करण्याची क्षमता असल्याचे आपण सिद्ध केल्याचीही ते म्हणाले. यावेळी बायोफ्युअल, बायोवेस्ट आणि ई-वेस्ट यावर देशातील विविध संस्था कार्य करीत असल्याची माहिती त्यांनी दिली. याशिवाय नेट-झिरो अभियानासाठीही नागपूरसह देशातील इतर शहरांमध्ये कार्य करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.