नागपूर : नागपूर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बांधण्यात येणाऱ्या नव्या अकरा मजली प्रशासकीय इमारतीचे काम सुरू करण्यात आले असून त्यासाठी परिसरातील उपविभागीय कार्यालय तोडण्यात येणार आहे. तेथील तहसीलदार कार्यालय जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात तात्पुरते हलवण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाची नवीन ११ मजली इमारत बांधण्यात येत आहे. इमारतीसाठी २७२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या इमारतीच्या तळघरात वाहनतळाची व्यवस्था असेल. सध्याची जिल्हाधिकारी कार्यालयाची जुनी इमारत (जेथे जिल्हाधिकारी यांचा कक्ष आहे) आहे. ती हेरिटेज श्रेणीमध्ये येत असल्याने ती कायम असेल. पण, परिसरातील इतर इमारती तोडण्यात येणार आहेत. त्यात उपविभागीय कार्यालय, सेतू कार्यालय, जुने उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय, खनिकर्म विभागाच्या कार्यालयासह व इतर इमारतींचा समावेश आहे. उपविभागीय कार्यालय १९७१ मध्ये बांधण्यात आले होते. त्याची अनेकवेळा डागडूजी करण्यात आली. याच इमारतीत नागपूर तहसील कार्यालय आहे. त्याला तात्पुरत्या स्वरूपात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागच्या भागात असलेल्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात हलवण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांनी तेथे कामाला सुरुवात केली आहे.
अधिकाऱ्यांचे दालन तयार होत आहे. ते झाल्यावर त्यांचे काम तेथे सुरू होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाची रेकॉर्ड रुम तोडून तेथून नवीन रस्ता तयार केला जाणार आहे. यासाठी सध्या अस्थायी स्वरूपाचा रस्ता मागच्या बाजूने तयार केला जात आहे. त्यासाठी संरक्षक भिंत तोडण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहे. विविध विभागाच्या इमारतीतील कर्मचारी इतरत्र स्थानांतरित झाल्यावर आवश्यक इमारतींचे तोडकाम सुरू केले जाईल. तीन वर्षात इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्याचे नियोजन असले तरी इतक्या कमी वेळेत ते पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय कार्यालय परिसरात अनेक वर्षे जुने मोठे वृक्ष आहेत. ते तोडण्यास पर्यावरणवाद्यांचा विरोध आहे. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आंदोलनही केले, हे येथे उल्लेखनीय.