चंद्रपूर : गोसेखुर्द प्रकल्पातील कालव्याच्या कामावर एका २५ वर्षीय कामगाराचा विद्युत शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (१४ मे ) सकाळी ९.३० च्या सुमारास नागभीड तालुक्यातील आलेवाही (खरकाडा) येथे घडली. राहुल दिवाकर चिमलवार रा. जिवनापूर असे मृत कामगाराचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कंपनीतर्फे कामगारांना सुरक्षा पुरविण्यात येत नसल्याने मृत्यू झाल्याचा आरोप करून कुटुंबीयांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत मृतेदह नवभारत कंपनीच्या कार्यालयातच होता.

प्राप्त माहितीनुसार, नागभीड तालुक्यातील आलेवाही खरकाडा परिसरात गोसेखुर्द प्रकल्पाच्या खुल्या कालवा २ चे काम अनेक वर्षांपासून सुरू आहे. कालव्याच्या कामाचे कंत्राट नवभारत नावाच्या कंपनीला मिळालेले आहे. या ठिकाणी स्थानिक तथा अन्य ठिकाणचे कामगार कार्यरत आहेत.

हेही वाचा – नागपूर : विवाहित प्रेयसीवर बलात्कार

राहुल चिमलवार हा मागील दोन वर्षांपासून कालव्याच्या कामावर कार्यरत आहे. कंपनीमध्ये कामगार काम करीत असताना त्यांना सुरक्षा पुरविणे बंधनकारक आहे. परंतु या ठिकाणी कपंनीतर्फे कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. आज रविवारी जिवनापूर येथील राहुल चिमलवार (२५) हा नेहमीप्रमाणे कामावर गेला होता. दरम्यान साडेनऊच्या सुमारास कालव्यावर काम करीत असताना लोखंडी सळाखीचा कालव्यावरून गेलेल्या हायहोल्टेज विद्युत तारांना स्पर्श झाल्याने त्याला जबर विद्युत शॉक लागला. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याला लगेच कंपनीतर्फे ब्रम्हपुरी येथील रुणालयात हलविण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह सायंकाळी जिवनापूर येथे आणण्यात आले. परंतु मृतक कामगाराच्या कुटुंबीयांनी मृतदेह घेण्यास नकार दिला.

कंपनीने कोणतीही सुरक्षा न पुरविल्यानेच राहुलचा मृत्यू झाल्याचा आरोप केला. राहुल हा कुटुंबीयांचा एकुलता एक कमावणारा मुलगा होता. त्याच्या मृत्यूने कुटूंबीय उघड्यावर आल्याने आर्थिक मदतीची मागणी करण्यात आली. कुटुंबीयांनी मृतदेह न स्वीकारल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली. तळोधी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन परिस्थिती हाताळली. मृतदेह स्वीकारण्यास नकार दिल्याने गावात तणावपूर्ण स्थिती निर्माण होत असताना कंपनीने कामागराचा मृतदेह कंपनीमध्ये नेला. सायंकाळी सातच्या सुमारास मृतकाच्या कुटुंबीयांना चर्चेसाठी बोलविण्यात आले. यावेळी कुटुंबीयांनी १५ लाखांची मागणी केली.

हेही वाचा – नागपूर: सातवीच्या विद्यार्थिनीवर युवकाचा बलात्कार

कंपनी व कुटुंबीय व पोलिसाच्या समक्ष झालेल्या चर्चेतून कंपनीने १५ लाख देण्याचे मान्य केले. तात्काळ २ लाख देण्यात आले. त्यानंतर कुटुंबीय मृतदेह स्वीकारण्यास तयार झाले. वृत्तलिहिपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार झालेला नव्हता.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Worker died due to electric shock at gosekhurd work rsj 74 ssb
Show comments