चंद्रपूर : वेकोलिच्या धोपटाळा खुल्या कोळसा खाणीत मातीच्या ढिगाऱ्यावरील चैन डोजरच्या खाली येऊन नागराजू पोनगंटी (३२, रा. तेलंगणा) या कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना ९ मे रोजी रात्री उशिरा घडली. कामगाराच्या मृत्यूची माहिती कोणालाही न देता मृतदेह परस्पर घटनास्थळावरून हलवण्यात आला.
हेही वाचा – लोकजागर : ‘रामशास्त्री’ राठोड!
बुधवारी सकाळी ही बाब उघडकीस येताच कामगारांनी पाच तास कोळसा खाण बंद पाडली. अखेर वेकोलिने नियमानुसार आर्थिक मोबदला देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर तणाव निवळला. घटनास्थळाचा पंचनामा करून कोळसा खाण पूर्ववत सुरू करण्यात आली. घटनास्थळी पुरेशी प्रकाश व्यवस्था नसल्याने हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. डोजर आपरेटर रवींद्र कुमार यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.