यवतमाळ : जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने शेतकरी न्याय हक्कासाठी जिल्हा मध्यवर्ती बँक चौकात आज सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात बोलण्याची संधी मिळालेल्या कार्यकर्त्यांनी उपस्थित काँग्रेस नेत्यांना, त्यांच्या अकार्यक्षमतेमुळेच पक्षाचे खस्ताहाल झाल्याचे सांगत, खडेबोल सुनावले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सरकार विरोधातील शेतकरी आंदोलनात काँग्रेस नेत्यांविरोधातच कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केल्याने नेत्यांचे चेहरे बघण्यासारखे झाले होते. सातत्याने होणाऱ्या पराभवानंतरही काँग्रेस नेते जमिनीवर आले नाही. शेतकरी, सर्वसामान्यांच्या प्रश्‍नाकडे लक्ष दिले जात नाही. यामुळेच काँग्रेसला नेहमी पराभवाचा सामना करावा लागत असल्याचे सांगत काही कार्यकर्त्यांनी मनातील भावनांना मोकळी वाट करून देत नेत्यांचे कान टोचले.

शेतमालाला भाव, कापसाची खरेदी सुरू करावी, सोयाबीन केंद्र सुरू करावे, पीकविमा व शेतकऱ्यांना वीज मोफत द्यावी, निवडणुकीपूर्वी दिलेले शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करावे, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. एरवी आंदोलनात काँग्रेसचे तेच ते नेते बोलतात, मात्र आज आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांना बोलण्याची संधी मिळाली. या संधीचे सोने करत कार्यकर्त्यांनी पक्षनेत्यांच्या अकार्यक्षमतेबद्दल असलेला रोष थेट बोलून दाखवला. विधानसभा निवडणुकीत पराभव का झाला? याची कारणे अनेकांनी स्पष्ट सांगितली. ही कारणे ऐकून नेतेही चाट पडले. यामुळे काँग्रेसचे आजचे आंदोलन शेतकरी प्रश्‍नावर असले तरी, यात कार्यकर्त्यांच्या भाषणांचीच चर्चा रंगली होती.

यावेळी आंदोलनकर्त्यांनी, विदर्भातील शेतकरी हवलदिल झालेला असून त्याच्या शेतमालाला भाव नाही. आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यात एमएसपी अंतर्गत बंद झालेली कापूस खरेदी व सोयाबीनची बंद केलेली खरेदी शासनाने तत्काळ सुरू करण्यात यावी, चना, तूर इतर देशातून आयात न करता आपल्याच मालाला योग्य भाव द्यावा, पीक विमा व वीज शेतकऱ्यांना मोफत द्यावी, निवडणुकीपूर्व शेतकऱ्यांना शासनाने कर्जमाफीचे आश्वासन दिले त्याप्रमाणे तत्काळ कर्जमाफी जाहीर करावी, या मागण्या केल्या.

या आंदोलनात माजी प्रदेशाध्यक्ष माणिकाराव ठाकरे, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, प्रा.वसंत पुरके, जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल मानकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल ठाकरे, राजीव कासावार, जितेंद्र मोघे, स्वाती येंडे, माजी नगरसेवक प्रा.बबलू देशमुख आदीसह कार्यकर्ते सहभागी झाले होते. लोकसभा निवडणुकीत राज्यात जोरदार कामगिरी करणाऱ्या काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत मात्र दारूण पराभवाचा सामना करावा लागला. तेव्हापासून महाविकास आघाडीतील मित्रपक्षांसोबतच विरोधी पक्षातील नेते काँग्रेस नेत्यांवर टीका करीत आहेत. आतातर कार्यकर्त्यांनीच काँग्रेस नेत्यांना खडेबोल सुनावल्याने काँग्रेसमध्ये नेमकं चाललंय तरी काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.