लोकसत्ता टीम
नागपूर : लोकापयोगी आणि पर्यावरणाशी संबंधित एखादा प्रकल्प हाती घेण्यापूर्वी सर्व बाबी तपासून आणि संबंधित घटकांशी चर्चा न करण्याच्या प्रवृतीचा शहरातील फटका फुटाळा तलावातील जागतिक दर्जाच्या संगीत कारंजी प्रकल्प बसला आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्चानंतर आता कामे ठप्प झाले असून अर्धवट झालेला प्रकल्प धुळखात आहे.
नागपूरच्या सौंदर्यात भर घालू शकणारे जागतिक दर्जाचे फुटाळा म्युझिकल फाऊंटन आणि लाईट-शो प्रकल्प सध्या धुळखात पडून आहे. फुटाळा तलावावर प्रेक्षक दीर्घिका, बहुमजली वाहनतळ आणि सिमेंट क्रॉक्रीटचा रस्ता तसेच फुटाळा तलावात संगीत कारंजे बसवण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. यातील प्रेक्षक दीर्घिका, बहुमजली वाहनतळ आणि सिमेंट क्रॉक्रीटचा रस्त्याचे काम महामेट्रोकडे आहे. तर नागपूर सुधार प्रन्यासकडे संगीत कारंजे बसवण्याचे काम आहे.
केंद्रीय रस्ते निधी, राज्य सरकार आणि नासुप्रच्या निधीतून हा प्रकल्प उभारायचा आहे. नागपूर शहराला पर्यटन क्षेत्रात नावलौलिक मिळवून देण्याची क्षमता या प्रकल्पात आहे. परंतु पर्यावरणाच्या बाबीकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे पर्यावरणवादी न्यायालयात गेले आणि प्रकल्प रखडला. प्रेक्षक दीर्घिका, सिमेंट कॉक्रिटचा रस्ता आणि संगीत कारंज्याचे काम पूर्ण झाले आहे. अनेकदा संगीत कारंजे दाखवण्याचे प्रयोग देखील झाले. आता डिसेंबर २०२३ पासून काम थांबलेले आहे.
हा संपूर्ण प्रकल्प सुमारे ४५० कोटी रुपयांचा आहे. एखादा प्रकल्प हाती घेताना संबंधित खात्याच्या परवानगी घेणे अनिवार्य असते, परंतु आधी प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करून नंतर परवानगी घेण्याचा प्रयत्न अलिकडे वाढीस लागले आहे, असा आरोप पर्यावरणवादी संघटनांचा आहे.
प्रकल्पाची वैशिष्टे
५० मीटर उंच कारंजे आणि त्यावरील डिजिटल स्क्रीन. त्यावर नागपूरचा इतिहास सांगण्यात येणार होता. ही कारंजी पाहण्यासाठी फुटाळा तलावाजवळ प्रेक्षक दीर्घिका ही चार हजार आसन क्षमतेची आहे. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला बारा मजली फूड-प्लाझा आणि अकराशे वाहनांसाठी वाहनतळ उभारण्याचे काम सुरू झाले होते.
सध्या स्थिती काय?
पर्यटकांचे आकर्षण म्हणून ओळखली जाणारी ही प्रेक्षक दीर्घिकेला आता जंग चढू लागला आहे. तर काही भागाची दुरवस्था झाल्याचे दिसून येते. या परिसरात केलेल्या सौंदर्यीकरणाची अवस्था वाईट आहे.तेथे लावण्यात आलेली शिल्पे एकतर तुटलेली आहेत किंवा गायब झाली आहेत. तिकीट खिडक्या आणि त्या आवारात स्थापित करण्यात आलेले भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरवरही धूळ पडला आहे. तिकीट खिडक्यांजवळ कचरा, दारूच्या बाटल्या आणि फेकून दिलेले रॅपर पडलेले असतात.
पर्यावरवाद्याकडे दुर्लक्ष करणे अंगलट
सुरूवातीपासूच फुटाळा तलावातील कारंजी प्रकल्पाला विरोध झाला. पर्यावरण तज्ञ, प्राणिशास्त्रज्ञ आणि वारसा संरक्षणवादी यांनी संभाव्य पर्यावरणीय आणि संरचनात्मक हानीचे कारण देत त्याची प्रकल्पाला विरोध दर्शवला होता. तरीही, याकडे दुर्लक्ष केले गेले. एकेकाळी नागपूरकराच्या संध्याकाळच्या पर्यटनाचे केंद्रबिंदू असलेला फुटाळा तलाव प्रेक्षक दर्घिकेमुळे सर्वसामान्यांसाठी बंद झाला आहे.
अडचण काय?
तलावातील संगीत कारंजी नियमानुसार बांधण्यात आलेले नाही तसेच तलाव हा पाणथळ प्रदेशात मोडत असल्याने तेथे बांधकाम करणे अवैध असल्याने पार्किंग प्लाझाच्या बांधकामाला स्थगिती देण्याची विनंती करणारी जनहित याचिका स्वच्छ फाउंडेशनने केली आहे.
प्रशासनाची भूमिका
नासुप्रचे सभापती संजय मीणा आणि महामेट्रोचे जनसंपर्क अधिकारी यांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर भाष्य करण्यास नकार दिला.