अकोला: जागतिक स्तरावर दरवर्षी ३०० ते ५०० दशलक्ष हिवतापाचे रुग्ण आढळून येतात. डासाच्या माध्यमातून या आजाराचा प्रसार होतो. हिवताप हा जीवघेणा आजार देखील ठरू शकत असल्याने वेळीच उपाययोजना करणे आवश्यक असल्याची माहिती अकोला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली.
‘जागतिक हिवताप दिन’ २५ एप्रिलला दरवर्षी साजरा केला जातो. हिवताप विषयी जनतेमध्ये जागृती निर्माण होऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी विविध उपक्रम घेतले जातात. केंद्र सरकारच्या धोरणानुसार हिवताप राष्ट्रीय हिवताप कार्यक्रमाचे दुरीकरण सन २०२७ अखेरपर्यंत करण्याचे नियोजन आहे. हिवताप या आजाराचा प्रसार ‘अँनाफिलस’ डासाच्या मादीमार्फत होतो. या डासाची उत्पत्ती स्वच्छ साठवून राहिलेल्या पाण्यात होते.
अशी होते हिवतापाची लागण (How Malaria Spreads)
हिवताप हा ‘प्लाझमोडीयम’ या परोपजीवी जंतूपासून होतो. जगामध्ये दरवर्षी सर्वसाधारणपणे ३०० ते ५०० दशलक्ष हिवतापाचे रुग्ण आढळतात. हिवतापाच्या जंतूचे ‘फॅल्सीफरम’ व ‘व्हायव्हाँक्स’ हे दोन प्रकार प्रामुख्याने आढळून येतात. हिवतापाचा प्रसार ‘अँनाफिलीस’ डासाच्या मादीमार्फत होतो. हिवतापाचा अधिशयन काळ हा १० ते १२ दिवसाचा आहे. या डासांची उत्पत्ती स्वच्छ साठून राहिलेल्या पाण्यात होते.
डास हिवताप रुग्णास चावतो, त्यावेळेस रक्ताबरोबर हिवतापाचे जंतू डासाच्या पोटात जातात. तेथे वाढ होऊन ते जंतू डासाच्या लाळेवाटे निरोगी मनुष्याच्या शरीरात सोडले जातात. मनुष्याच्या शरीरात हे जंतू लिव्हरमध्ये जातात. त्या ठिकाणी त्यांची वाढ होऊन १० ते १२ दिवसांनी मनुष्याला थंडी वाजून ताप येतो.
ही आहेत हिवताप आजाराची लक्षणे (Symptoms of Malaria)
हिवतापची लागण झाल्यास थंडी वाजून ताप येतो. ताप हा सततचा असू शकतो किंवा एक दिवसाआड येऊ शकतो. तापानंतर घाम येऊन अंग गार पडणे, डोके दुखणे व बऱ्याच वेळा उलट्या होतात. तीव्र डोकेदुखी मान ताठ होणे, झटके येणे, बेशुद्ध होणे आदी लक्षणे सुद्धा आढळून येतात. हिवताप प्रसारक डासांची उत्पत्ती स्वच्छ पाण्यात होते. डास स्वच्छ पाण्यात सुमारे १५० – २०० अंडी घालतात. अंडी, अळ्या, कोष, प्रौढ डास हे डासाचे जीवन चक्र आठ ते दहा दिवसात पूर्ण होतात. डास उत्पत्ती थांबवण्यासाठी नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या पाहिजेत, असे डॉ. बळीराम गाढवे यांनी सांगितले.